Jaundice outbreak in Rajur
अकोले : राजूर गावात काविळीचे शनिवारी तब्बल १९ रुग्ण वाढले असुन काविळीने मिसबाह इलियाज शेख (वय १३) या मुलीच्या रुपाने दुसरा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांनमध्ये घबराट पसरली आहे. तर काविळीचे २६३ रुग्ण आढळून आले आहेत, दरम्यान काविळच्या प्रादुर्भावाची नैतिक जबाबदारी स्विकारुन उपसरपंच पदाचा सतोष बनसोडे यांनी राजीनामा दिल्याने राजूरकारामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन आठवडाभरापासुन राजूर गावात कावीळीच्या साथीने थैमान घातले असून राजूर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे पाण्याच्या टाकीत गाळ आढळून आला. तसेच पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र बंद अवस्थेत दिसून आले. परिणामी काविळ आजाराने आतापर्यंत २६३ काविळीचे आढळून आले आहेत. तर बहुतांश रुग्ण खाजगी व सरकारी दवाखान्यातुन उपचार घेत असुन गंभीर काविळ रुग्ण पुणे,नाशिक, मुंबई, सगमनेर येथील खाजगी दवाखान्यात हालविण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे काविळीच्या साथीने प्रियंका हरिभाऊ शेंडे हिचा पहिला बळी गेल्यावर आरोग्य यंत्रणा संतर्क होत ग्रामसेवक राजेंद्र वर्पे यांना बडतर्फ केले. तर पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करणारे पर्यवेक्षक डॉ. विनोद भिसे यांना निलंबित केले. तसेच अकोले आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे, डॉ.प्रशांत शेलार,सुपरवायझर मोहन पथवे,आरोग्य सेवक अमित झांबरे,धोडीराम शेळके,पर्यवेक्षक विलास शेळके या पथकाने आरोग्य सेवक,आशासेविका , गटप्रवर्तकाचे ४० टीम करुन गावात काविळ रुगणाचा सर्वे करुन मेडिक्लोरच्या बाँटल व काविळ बाबत जनजागृती करणारी पत्रके वाटली. तसेच पिण्याच्या पाण्याची नुमुने तपासणी करण्यात आली.
पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे रिपोर्ट आले आहेत. तर पाण्याच्या टाकीत मेडिक्लोर टाकुन पाणी नुमुने घेण्यात येऊन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. माजी आ. वैभव पिचड यांनी तात्काळ राजूर गावातील काविळ रुग्णांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गटविकास अधिकारी अमर माने यांना गावातील आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाबाबत जाब विचारत प्रशासनाचे अपयश आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगितले. काविळमुळे मिसबाह इलियाज शेख या मृत्यू पावलेल्या मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वनही केले. तसेच आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही कावीळमुळे मृत्यू पावलेल्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे सात्वन करत आरोग्य विभागाला काविळबाबत सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
राजुर गावात काविळमुळे दोन मुलींचा मुत्यू झाला असुन शनिवारी काविळचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. दररोज काविळचे रुग्ण वाढत असल्याने काविळचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आरोग्य विभागाचे डॉ. शिल्पा तोमल,डॉ कुणाल पिसे हे शास्त्रज्ञासह जिल्हा साथरोग अधिकारी नारायण वायबासे हे राजूर गावात दाखल झाले आहेत. ते काविळीचे मुळ शोधण्यासाठी राजूर परिसरात भेट देत पाणी नमुने, रुग्णांचे रक्त नमुने घेऊन माहिती घेत आहेत. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षकासह आशासेविका २३० कर्मचारी राजूर गावात ठाण मांडुन काविळ बांधिताचा शोध घेत आहेत.
गेल्या १५ दिवसा पासून राजूर मध्ये काविळीचे थैमान आहे. तर दुषित पाण्यामुळे काविळचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वीच राजूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा टाकी साफ सफाई करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वर्पे यांना मासिक बैठकीत ठराव करून पाण्याच्या टाकीची साफ सफाई करण्यास सांगितले होते.
पाणी टाकी स्वच्छता विषयावर कोणतीच कारवाई संबंधित ग्रामविकास अधिका-याकडून झाली नाही. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग्याच्या पर्यवेक्षकांनी कधी पाण्याच्या टेस्ट केल्या नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यामुळे मी सुद्धा माझी नैतिक जबाबदारी समजून माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच माझ्या बरोबर काविळबाबत संबंधित अधिकारी व पदाधिका-याची जबाबदारी असल्याचे उपसरपंच सतोष बनसोडे यांनी सांगितले.