राहुरी : राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी विखे-कर्डिले गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर विरोधी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात, शेतकरी मंडळाचे राजू शेटे यांनीही मेळावा घेऊन जोरदार कंबर कसली आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेटे यांनी भेट घेत त्यांच्याकडून मदतीचा शब्द घेतला आहे. त्यामुळे कळत नकळत आता राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचीही एन्ट्री होणार आहे. आता महायुतीतील विखे-कर्डिले हे या शिंदे सेनेला सोबत घेणार, की एकमेकांविरोधात दंड थोपाटणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राहुरी येथील बंद पडलेल्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत दंड थोपाटलेले शेतकरी विकास मंडळाचे संस्थापक राजूभाऊ शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मदतीचा शब्द घेतला. कारखान्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे शेटे यांनी सांगितले.
शेटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत तनपुरे कारखान्याबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये सभासद, कामगार देणी, शासकीय देणी, जिल्हा बँक देणी तसेच इतर देणींबाबत तपशिलवार माहिती दिली. तनपुरे कारखान्याच्या हाकेच्या अंतरावर ऊस क्षेत्र असतानाही कारखाना सुरू होऊ शकत नसल्याचे शल्य व्यक्त केले. अत्यंत कमी ऊस वाहतूक तसेच मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र उपलब्ध असताना सभासद, कामगारांचे हाल होत आहे. कारखाना बंद असल्याने जिल्ह्यातील इतर कारखानदार ऊस तोडणीसाठी आर्थिक छळ करतात. कामगारांची थकीत देणी तसेच काम मिळत नसल्याने बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. कारखान बंद पडल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. कारखान्याशी संलग्न असलेल्या संस्थाही अडचणीत येऊ लागल्या आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून काही जण संलग्न संस्थांचे लचके तोडत आहे. संलग्न संस्थातील अधिकारी, कामगारांना घरगडीप्रमाणे वागणूक देणार्यांकडूनच राहुरी कारखान्याचा छळ होत आहे. या सर्व विचार करता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी काळात शेतकरी विकास मंडळाचे संस्थापक शेटे यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिला.
शेटे यांनी तनपुरे कारखाना निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू करण्याचा चंग बांधला आहे. शेटे यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी प्रवक्ते संजीव भोर यांची मदत मोलाची ठरली.