Water Tanker Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Tanker Water Supply: पाणी उपलब्ध झाल्याने टँकरची संख्या घटली; १९ गावे, ४८ वाड्यांना १७ टॅंकरने पाणीपुरवठा

जुलै महिना सुरू होताच संगमनेर तालुक्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: जुलै महिन्यात तालुक्यात झालेल्या पावसामुळे काही गावांना पाणी उपलब्ध झाल्याने ५ टँकर बंद करण्यात आले आहे. सध्या १९ गावे, ४८ वाड्यांना १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा पडल्याने पाणीटंचाई जाणवत होती.

यामुळे मार्च महिन्यातच काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. तर एप्रिलमध्ये ही संख्या वाढली जून अखेर ३१ गावे व ७५ वाड्यांना टॅंकरने २२ पाणीपुरवठा सुरू होता. मात्र जुलै महिना सुरू होताच संगमनेर तालुक्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

चार ते पाच दिवस सलग पाऊस सुरू होता. या पावसाने मोठा दिलासा मिळाला पाऊस पडल्याने जवळपास ९० शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पावसामुळे तालुक्यातील वातावरण बदल होवून गारवा निर्माण झाला. जून महिना अखेर संगमनेर तालुक्यात ३१ गावे ५७ वाड्यांना २२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता.

जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने १२ गावे व २७ वाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. यामुळे ५ टँकर बंद करण्यात आले.

सध्या १९ गावे, ४८ वाड्यांना १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शासकीय ४ व खाजगी १३ टँकरचा समावेश आहे. डोळसणे, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, चौधरवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, कर्जुले पठार, गुंजाळवाडी, पठार, दरेवाडी, कौठे मलकापूर, हिवरगाव पठार, जांभूळवाडी, पारेगाव बुद्रुक, रणखांब वाडी, साकुर, बिरवाडी व अकलापूर, अशी गावे व या गावांतर्गत येणाऱ्या विविध वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तर २७ हजार दोनशे ४९ नागरिक या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या कुठल्याही नवीन गावाचा टँकरचा प्रस्ताव आलेला नाही. जर पाऊस असाच सुरू राहिला तर आणखीही पाण्याचे टँकर कमी होण्याची शक्यता आहे.

टँकर सुरू ठेवण्याची मुदतच जुलै अखेर आहे. जर काही गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही तर ऑगस्ट महिन्यात टँकर सुरु ठेवावे लागणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा मुदत वाढ घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT