नगर: शिर्डीच्या भूपेंद्र राजाराम सावळेकडून दीड कोटी रुपये घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मोठा आटापिटा केल्याची माहिती समोर येत आहे. नगद मिळत नसल्याने त्याच्या नावे राहुरीतील स्मॉल फायनान्समध्ये अकाउंट ओपन करण्यात आले. त्यात सावळेने दीड कोटी रुपये टाकून ते लगेचच काढून घेतल्याची (विड्रॉल) माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, निलंबित केलेल्या चारही पोलिसांची विभागीय चौकशी सुरू झाल्याचे समजते.
ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या नावाने शिर्डीत सुमारे तीनशे कोटींची फसवणूक करणार्या सावळे यास अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या कृत्याला वाचा फुटली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, हवालदार मनोहर सीताराम गोसावी, बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि गणेश प्रभाकर भिंगारदे यांचे प्रथमदर्शनी गैरकृत्य आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या चारही पोलिसांची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. (Latest Ahilyanagar News)
रिझर्व्ह बँकेचा कोणताही परवाना नसताना सावळे याने गुंतवणूकदारांकडून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत सुमारे तीनशे कोटी रुपये जमविल्याची माहिती आहे. जमविलेले पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतविले. मात्र मार्केट कोसळल्याने त्याचे गणित विस्कटले. त्यामुळे तो गुंतवणूकदारांचे पैसे न देता नाशिकला पसार होत असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास लोणीत पकडले. तेथून त्याला नगरला आणले. कारवाई करण्याची धमकी देत दीड कोटी रुपये घेतल्याची कबुली सावळे यानेच दिली आहे.
सावळेच्या़ कबुली जबाबानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्याची सत्यता पडताळणी केली. त्याने अकाउंट कधी ओपन केले? त्यातून किती व कधी पैसे ट्रान्सफर केले? त्याच वेळी रोकड काढण्यात आली का? किती काढली? याची चौकशी केल्यानंतर तांत्रिक बाबी जुळून आल्याने सावळेची माहिती खरी असल्याचे समोर आले. त्यानंतर चौघांना निलंबित करत त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
राहुरीचीच निवड का?
सावळेकडून दीड कोटी रुपये स्वीकारण्यासाठी राहुरीचीच निवड का करण्यात आली? त्या फायनान्स कंपनीचे संचालक कोणाच्या परिचयातील आहेत? त्या फायनान्स कंपनीला हा व्यवहार करण्यासाठी कमिशन दिले की दबाव टाकून करून घेतले? असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रोकड गेली कुठे?
सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड राहुरीतून काढण्यात आल्यानंतर तिचे पुढे काय झाले, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. अर्थात पोलिस चौकशीत या बाबी समोर आल्या असतील; मात्र त्या माध्यमांपासून लपविण्यात येत आहेत. दीड कोटीतील वाटेकरी कोण कोण? याचीही चर्चा पोलिस दलात रंगली आहे. काहींनी मिळालेली रोकड कुटुंबीयांच्या नावे बँक खात्यांमध्ये भरल्याचे समजते. त्यादृष्टीनेही पोलिस तपास सुरू असल्याचे समजते.