राहुरी: गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेल्या राहुरी नगरपालिकेसाठी आज मतदान होणार असून, त्यानंतर उद्या रविवारी लगेचच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांचीही धाकधूक वाढल्याचे दिसते आहे. राहुरी नगरपरिषदेवर तनपुरे कुटुंबियांची एकहाती सत्ता राहिली आहे. शहरातील नागरीकांनी वेगवेगळ्या निवडणुकीत आपली भूमिका बदलली. परंतु शहराचे कारभारी म्हणून नेहमीच तनपुरे कुटुंबियाला पाठबळ दिले. केंद्रासह राज्यामध्ये विरोधकांना जागा दाखविणाऱ्या भाजपने राहुरीतही तनपुरे गटाचा गड खालसा करण्याच्या उद्देशाने नियोजन आखले.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तनपुरे कारखाना तसेच बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांसह रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबतीला घेत सावध पावित्रा घेतला. परंतु चाचा तनपुरे यांच्यासोबतच्या युतीनंतरही विकास आघाडीला काही प्रभागामध्ये स्वकीयांची बंडखोरी रोखता आलेली नाही. दुसरीकडे भाजपने आपल्या पॅनलमध्ये नाराजांची बंडखोरी होऊ न देता ताकद निर्माण केली. त्यातही, शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपाला सोडून सवता सुभा उभा केला. परिणामी महायुतीमध्ये फाटाफूट होऊन शिंदे सेनेने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे यांच्या रुपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तसेच 8 धनुष्यबाण चिन्ह असलेले तर अपक्ष पुरस्कृत 4 असे एकूण 12 नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले. तनपुरे यांच्या विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब छबु मोरे यांना उमेदवारी दिली. भाजपने चाचा तनपुरे यांचे खंदे समर्थक सुनिल पवार यांना पक्षात घेऊन ताकद दिली. यांसह वंचितकडून बापुसाहेब माळी हे उमेदवार उभे होते. तनपुरे यांच्या विकास आघाडीकडून व भाजपकडून सर्व जागेवर उमेदवार उभे होते.
दरम्यान, विकास आघाडी मंडळातील प्रभाग 2 मध्ये रविंद्र हिराचंद तनपुरे यांनी बंडखोरी केल्याने तनपुरे गटाचे उमेदवार केतन दशरथ पोपळघट यांना बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. प्रभाग 3 मध्येही तनपुरे गटाचे खंदे समर्थक सचिन तनपुरे यांनी बंडखोरी करत शिंदे सेनेकडून पत्नीला उमेदवारी मिळवली. तर प्रभाग 4 मध्ये तनपुरे गटाचेच कांता तनपुरे यांनीही अपक्ष उमेदवारी करत चाचा तनपुरे यांचे चिरंजीव प्रतिक तनपुरे यांच्यासाठी डोकेदुखी वाढवली. तर याच प्रभागामध्ये सेनेकडून संकेत तनपुरे यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या प्रभागाच्या निकालाची उत्कंठा वाढली आहे. प्रभाग 5 मध्येही भाजप उमेदवार गणेश खैरे यांना गोपाळ अग्रवाल व योगेश सोलंकी या स्वपक्षियांची बंडखोरी पाहता विकास आघाडीचे गजानन सातभाई यांच्या विरोधातील लढत रंगतदार झाल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये भाजपचे खंदे समर्थक राजेंद्र उंडे यांना मित्र पक्ष असलेलेल्या शिंदे सेनेचे नालकर व विकास आघाडीचे संजीव उदावंत यांची लढत निर्णायक ठरेल. प्रभाग 9 मध्ये तनपुरे यांचे समर्थक विलास तनपुरे यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने प्रशांत डौले यांना कडवी लढत द्यावी लागली.
भाजपला शिंदे सेनेच्या उमेदवारांमुळे फटका बसेल, अशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे राहुरी नगरपरिषद ही पारंपारीकरित्या तनपुरेंच्याच ताब्यात राहणार असल्याचा दावा तनपुरे गटाकडून ठोकला जात आहे. तर विधानसभेच्या निकालाप्रमाणेच मतमोजणीत चमत्कार दिसून येत स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या स्वप्नपूर्तीचा भगवा राहुरी नगरपरिषदेवर फडकणार असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. तर शिंदे सेना व वंचित प्रस्थापितांना झटका देणारच, असा दावाही आहे. त्यामुळे राहुरी नगर परिषदेचा निकाल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे व अक्षय कर्डिले यांच्यासाठी अत्यंत निर्णायक असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांसह माजी खासदार प्रसाद तनपुरे, अरुण तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्यासाठी निकाल प्रतिष्ठेचा ठरणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरचा निकाल विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ट्रेलर असणार असल्याचे बोलले जात आहे.
आज एका जागेसाठी मतदान
प्रभाग 2 अ (अनुसूचित जाती महिला) जागेबाबत न्यायालयीन आदेश आल्याने त्या जागेसाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. या जागेवर विकास आघाडीकडून लता बाळू जगधने, भाजपकडून भारती विकास जगधने तर अपक्ष म्हणून पुजा दत्तात्रय साठे या तीन उमेदवारांची लढत होत आहे.
दोन तासातच निकाल स्पष्ट होणार
दि. 21 डिसेंबर रोजी राहुरी नगरपरिषदेच्या निकालाची तयारी पूर्ण झालेली आहे. 12 नगराध्यक्ष पदासह 12 प्रभागातून 24 नगरसेवक निश्चित करण्यासाठी 12 टेबलवर मतमोजणी उद्या रविवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. दोन तासातच सर्व चित्र स्पष्ट होईल. 40 ते 42 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी केली जात असताना शेकडो पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली आहे.
संगमनेर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उत्कंठाफ
संगमनेर नगरपालिकेच्या 15 प्रभागातील 27 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली. आता उर्वरित तीन प्रभागातील प्रत्येकी एका जागेसाठी आज शनिवारी (दि.20) मतदान होत आहे. तर रविवारी मतमोजणी होणार असून, या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती व संगमनेर सेवा समितीत सरळ लढत होत आहे. तर काही अपक्षही आपले नशीब आजमावत असून नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिला जाणार आहे. संगमनेर नगरपरिषदेचा 15 प्रभागात 30 नगरसेवक असून यात पंधरा महिला व पंधरा पुरुष नगरसेवकांचा समावेश असणार आहे. एक नगराध्यक्षासह 27 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. मात्र यातील प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक दोन ब सर्व साधारण महिला व प्रभाग क्रमांक 15 ब मधील सर्व साधारण महिला या तीन प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने त्यांनी जिल्हाधिकारी व न्यायालयात दाद मागितली होती. या सर्वांचे अर्ज मंजूर झाल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे आता तीन प्रभागातील प्रत्येकी एका जागेसाठी आज शनिवारी मतदान होत आहे.
महायुती व संगमनेर सेवा समितीत सरळ लढत होत असून मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीन, अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या तीन जागांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे, दुर्गाताई तांबे यांनी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.तर महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार अमोल खताळ यांनी स्वतः उमेदवारासह प्रचार केला. आजच्या मतदान प्रक्रीयेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोपरगावचा 61 वा नगराध्यक्ष कोण?
तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या निकालासाठी दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे शहराचा 61 वा नगराध्यक्ष कोण होणार, याची शहरवासीयांना उत्कंठा आहे. आज शनिवारच्या मतदानानंतर निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष, कोल्हे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडणुकीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे. चारही पक्षाकडून, बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. अनेक प्रभागात लक्षवेधी लढती होत आहेत. कधी नव्हे ते या निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ‘लक्ष्मी’चा वापर झाला. ज्या-ज्या उमेदवारांनी ‘लक्ष्मी’ दर्शन दिले, ते ते मतदारांनी स्वीकारले. त्यामुळे मतदार कौल नेमका कोणाच्या पारड्यात टाकणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. कोपरगाव नगरपालिकेची स्थापना 15 ऑगस्ट 1947 साली झाली. मात्र पालिकेच्या नोंदीत 1947 पासून नगराध्यक्षांची कारकीर्द आहे.
या नोंदीनुसार आजपर्यंत 60 नगराध्यक्ष झाले आहेत. शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान शकुंतला बोर्डे यांना मिळाला होता. त्यांच्यानंतर उत्तमचंद अजमेरे यांना दोन वेळा, माधवराव आढाव यांना तीन वेळा, बाबुराव गवारे यांना दोन वेळा, वसंतराव सातभाई यांना दोन वेळा, सौ ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांना दोन वेळा, सुरेखा राक्षे यांना दोन वेळा, तर डॉ. कन्हैयालाल राठी, प्रेमचंद काले, वामनराव शिलेदार, साहेबराव शिलेदार, प्रकाश शिंदे, दिलीप दारूनकर, राजेंद्र शिंदे, बबन वाजे, जगन्नाथ आढाव, मंगेश पाटील, उज्ज्वला जाधव, विजय वाढणे, सिंधूबाई कोपरे, संजय सातभाई, कांचनबाई काले, पद्मकांत कुदळे, अशोक कोठारी, सुहासिनी कोयटे, राजेंद्र झावरे, राजेंद्र सोनवणे यांना कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. तर रवींद्र पाठक व मीनल खांबेकर यांना प्रभारी नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. तहसीलदार मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून 18 वेळेस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाची जबाबदारी पाहिली.
कोपरगावात दिग्गजांनी घेतल्या सभा
कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पराग संधान यांच्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काका कोयटे यांच्यासाठी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजेंद्र झावरे यांच्यासाठी, ठाकरे सेना नेत्या सुषमा अंधारे यांची सपना भरत मोरे यांच्यासाठी सभा घेण्यात आल्या. त्यामुळे कोपरगावचा सर्व प्रभागाचा भाग पिंजून निघाला आहे. चौरंगी, पंचरंगी लढतीत नगराध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडते, याविषयी उत्कंठा लागली आहे.