Manori Medical Dispute Pudhari
अहिल्यानगर

Manori Medical Dispute: गोळ्या बदलण्यावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत! मानोरीत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

मारहाणीचे परस्पर आरोप; दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मेडिकलमधून घेतलेल्या गोळ्या बदलून देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना तालुक्यातील मानोरी येथे नुकतीच घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.

एका बाजूने वसंत फ्रान्सिस आढाव (वय ५२, रा. मानोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना सर्दी, खोकला व तापाचा त्रास होत असल्याने त्यांचा मुलगा विशाल हा मानोरी येथील माऊली मेडिकलमधून औषधे घेऊन आला.

औषध घेतल्यानंतर त्रास झाल्याने गोळ्या बदलून आणण्यासाठी विशालला पुन्हा मेडिकलमध्ये पाठविले.

यावेळी औषधे बदलून देण्यास नकार दिल्याने विशालने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वसंत आढाव व त्यांचा मुलगा विवेक हे मेडिकलमध्ये गेले. त्यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली तसेच धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

या तक्रारीवरून अक्षय पिसाळ, किरण पिसाळ, राहुल पिसाळ, संदिप पिसाळ, बाळासाहेब पिसाळ, मंगल पिसाळ व अन्य एक अशा सात जणांविरुद्ध विविध कलमांसह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूनेही संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, या तक्रारीत मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या गटातील तक्रारदाराच्या फिर्यादीवरून वसंत आढाव व त्यांच्या बाजूच्या संबंधित व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप केले आहेत.

दोन्ही तक्रारींच्या आधारे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेमागील नेमका वाद, दोन्ही बाजूंच्या आरोपांची सत्यता आणि मारहाणीच्या प्रकाराबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT