राहुरी/वळण: राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात मळहद वस्ती परिसरातील उसाच्या शेतात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात एकमेकांचा बचाव करताना बापलेकांनी बिबट्याला झुंज देत आपली सुटका करून घेतली.
दोघेही त्यात जखमी झाले. गुरुवारी (दि. २७) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या ग्रामस्थ-शेतकऱ्यांमध्ये आणखी दहशत निर्माण झाली आहे. शासनाने व वन विभागाने या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
भीमराज सखाराम विटनोर (वय ४८) व दिगंबर (वय १७) अशी या बापलेकाची नावे आहेत. हे बापलेक आपल्या शेतात उसाला लावलेले पाणी पाहण्यासाठी गेले असता. शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या बिबट्याने भीमराज विटनोर यांच्यावर हल्ला केला.
वडिलांना बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मुलगा दिगंबर याने मातीची ढेकळे आणि दगड बिबट्यावर फेकले. त्यामुळे बिबट्याने भीमराज यांना सोडून देत दिगंबरकडे धाव घेतली.
तेव्हा मुलाला वाचविण्यासाठी भीमराज यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत बिबट्यावर धाव घेतली. आरडाओरडा ऐकून परिसरातील रहिवासी लक्ष्मण विटनोर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तिकडे धावले. त्यामुळे बिबट्याने पळ काढला.
जखमी बापलेकास मांजरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या राहुरीच्या टीमने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि परिसरात तातडीने पिंजरा लावला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके, वनपाल महेश ससे, वनरक्षक रामचंद्र आडगळे, बाळासाहेब आटूळे, निलेश जाधव, मेजर गवळी, वाहनचालक ताराचंद गायकवाड यांनी पाहणी केली करून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.
मांजरी वळण शिवारात सातत्याने आठ-दहा दिवसाच्या अंतराने बिबट्याचे पाळीव प्राण्यावर हल्लासत्र सुरूच असल्याने शेतकरी जागरूकच असतात. परंतु गुरुवारी माणसावरच हल्ला झाल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. या भागात एक-दोन नव्हे तर तीन-चार बिबटे अनेकांच्या दृष्टीस पडले आहेत. या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.