राहुरी: ‘तू सलमानजवळ मला शिवीगाळ केली काय?’ असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने एका २१ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. विट मारून जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित नंदुलाल उल्हारे (वय २१, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) या तरुणाने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. (दि. २ नोव्हेंबर) रोजी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अभिजित व त्याचा मित्र यश साळवे हे दोघे हरवलेले कुत्र्याचे पिल्लू शोधत होते. यावेळी त्यांना सलमान नामक तरुण भेटला.
अभिजित याने त्याला, ‘कुत्र्याचे पिल्लू पाहिले का, अशी विचारले, यावरून सलमान याने त्याला शिवीगाळ केली. अभिजित व यश पुढे गेले असता, मोटारसायकलवरून टोळके तेथे आले. ‘तू सलमनजवळ मला शिवीगाळ केली काय?’ असे म्हणत त्यांनी अभिजितयाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विटेने मारून जखमी केले. ‘यापुढे अशु सांगळे याला काही बोलला किंवा शिवीगाळ केली, तर जीवे मारू,’ अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले.
याप्रकरणी अभिजित उल्हारे यांच्या फिर्यादीवरून अशु सांगळे, आदी पाळंदे, साई पाळंदे, सलमान अस्लम शेख (सर्व रा. राहुरी फॅक्टरी) व अन्य चार अनोळखी तरुण अशा आठ जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.