Rahuri Sand Mining Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Sand Mining: दरडगाव परिसरात बिनधास्त वाळू उपसा; तक्रारीनंतरही प्रशासनाची टोलवाटोलवी?

मुळा धरण बॅकवॉटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रेती उपशाचा आरोप; महसूल, पोलिस व पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: दरडगाव थडी येथून नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाळू,रेती उपसा सुरू असल्याचे वास्तव समोर आल्यानंतरही ज्यांनी कारवाई करायची ते पोलिस, महसुल व पाटबंधारे विभागाने टोलवाटोलवी चालविल्याचा प्रकार समोर आला. कोणालाही उपशाची परवानगी दिली नसल्याचा दावा तालुका प्रशासनाकडून केला जात असताना उपसा करणाऱ्यांनी मात्र परवानगी असल्याचा अजब दावा केल्याने गोंधळात आणखीच भर पडली आहे.

मुळा धरण बॅकवॉटर परिसरात वाळू आणि माती तस्करीने प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. शेरी चिखलठाण, म्हैसगाव आणि दरडगावात दिवसाढवळ्या जेसीबी, पोकलॅन आणि डंपरच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू व मातीचा उपसा सुरू असताना महसूल, पोलिस आणि पाटबंधारे विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. परिणामी, ‘तस्करांना संरक्षण नेमके कोणाचे ?’ असा प्रश्न परिसरातील गावकऱ्यांना पडला आहे.

ज्यांनी कारवाई करण्याची अपेक्षा आहे त्या यंत्रणा मात्र एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचे तालुका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले, मात्र परवानगी असल्याचा दावा उपसा करणाऱ्यांकडून केला जात आहे.

तालुका प्रशासन अनभिज्ञ कसे?

वाळू, रेती उपसा करताना मुळा धरणातील गाळ उपसा धोरणाचा आधार घेतला जात असल्याची चर्चा आहे. दररोज २० ते २५ डंपर, पाच ते सहा टेम्पो आणि तीन ते चार ट्रॅक्टरद्वारे वाळू, रेती उपसा सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तेही भरदिवसा उपसा होत असताना तालुका प्रशासन अनभिज्ञ कसे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. छायाचित्र, चित्रण, लेखी तक्रार देवूनही प्रशासन कारवाई करत नाही. सामान्याने नियमभंग केला तर कारवाईस तत्पर असणारे तालुका प्रशासनाचे या उपशावर मौन का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी दिल्या. काहींनी व्हिडिओ व छायाचित्रेही सादर केली. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासन दिले गेले. कारवाई न झाल्याने तस्करांचे मनोबल वाढत असून तक्रारदारांनाच धमकावले जात आहे.
गावकऱ्यांचा दावा
वाळू अथवा माती उपशासाठी महसूल विभागाने कोणालाही परवानगी दिलेली नाही. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
अमित पवार, तहसीलदार
मुळा पाटबंधारे विभागाचे पथक रविवारी (१४ जून) प्रत्यक्ष मुळा पात्रात उतरून पाहणी करणार आहे. पंचनामा करून अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
राजेंद्र पारखे, शाखाभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT