राहुरी : राहुरी येथील बुवाशिंद बाबा तालीममध्ये झालेल्या महापुरुषांच्या विटंबनप्रकरणी आरोपी अटक होत नसल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 1 एप्रिलपासून राहुरी शहर बेमुदत बंदचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रशासन, व्यापारी व राजकीय, सामाजिक नेत्यांच्या एकविचारातून बंदचा हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केली.
राहुरी येथे पोलिस प्रशासन व सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. त्या पार्श्वभुमीवर सभापती तनपुरे यांनी राहुरी शहर बंद बाबत भूमिका स्पष्ट केली.
तनपुरे म्हणाले की, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, व्यापारी व शिवप्रेमींच्या संवादानंतर बंदचा निर्णय मागे घेतला आहे. राहुरी शहरात उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू राहणार आहे. सर्वांनी सहकार्य करत शांतता राखावी.
व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख म्हणाले की, व्यापार्यांनी राहुरी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घटनेतील आरोपी अटक व्हावे ही सर्वांची इच्छा आहे. व्यापारी व नागरीकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करीत शांतता राखावी. व्यापार्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून बंद मागे घेतल्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतल्याचे सांगितले.
यावेळी हर्ष तनपुरे, सचिन म्हसे, अमोल भनगडे, मुज्जू कादरी, गणेश खैरे, आर.आर. तनपुरे, विलास साळवे, बाळासाहेब उंडे, नीलेश जगधने, सुरज शिंदे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, आरोपी हिंदू असो की मुस्लीम त्यास चांगली अद्दल घडवावी. घटना घडून 5 दिवस उलटले तरीही आरोपी सापडत नाही ही लाजिरवाणी बाब आहे. बाहेरील लोकांनी राहुरीत वाद लावू नये. राहुरीकर आपल्या समस्या सोडविण्यास सक्षम असून पोलिस प्रशासनाने चोख भूमिका बजवावी, असा निर्णय शांतता कमेटी बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सर्वांच्या भावना जाणून घेतल्या.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की, पुतळा विटंबना प्रकरणात पोलिस प्रशासनाने आतापर्यंत 19 जणांची कसून चौकशी केली आहे. अजूनही आरोपी हाती लागलेले नाही. आरोपीबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. माहिती देणार्याचे नाव गुपीत ठेवले जाईल, असे पो.नि. ठेंगे यांनी सांगितले.
मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे म्हणाले की, एकीकरण समिती व क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिस ठाण्यासमोर आंदोलन हाती घेण्याचा निर्णयही मागे घेतला आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने आरोपी पकडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीला न पकडल्यास भविष्यात कोणताही अनूचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहिल, असे लांबे यांनी सांगितले.