लोणी: काँग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशातच जात असल्याने, देशातील राजकीय परीस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल, असा घणाघाती टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. दरम्यान, निवडणूक प्रक्रीयेविरोधातील गांधी यांची विधाने म्हणजे, मतदारांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना, मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ निवडणूक प्रक्रीयेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँगेस पक्ष जेमतेम 40 जागांपर्यंतच मजल मारू शकला होता. (Latest Ahilyanagar News)
यंदा 40 ऐवजी 100 जागा मिळाल्या, मग ते ‘फिक्सिंग’ होते का, असा सवाल करीत, मंत्री विखे म्हणाले की, आंध्र व हिमाचल राज्यात, तुमच्या पक्षाचे सरकार सतत्ते आले, मग तेसुध्दा ‘फिक्सिंग’मुळेच आले का, या प्रश्नांची उतरेसुध्दा राहूल गांधी यांनी द्यावीत, असे आव्हान त्यांनी केले.
निवडणूक प्रक्रीयेविरोधात बेताल विधान करून, राहूल गांधी स्वतःची बदनामी करून घेत आहेत. लोकसभेची निवडणूक खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली. काही ठिकाणी त्याचा परीणाम पहायला मिळाला.
विधानसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती मात्र काहीशी वेगळी होती. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला, मात्र मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम राहूल गांधी करीत आहेत, मात्र त्यांनी देशात राहून, जनतेस वेळ दिला तरचं, त्यांना येथील राजकीय वस्तुस्थितीची माहिती होईल, असे विधान मंत्री विखे यांनी केले.
राऊत- सुळेंच्या वक्तव्यांकडे दुर्लक्षच करावे!
उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत व खासदार सुप्रिया सुळे यांनी, राहूल गांधी यांच्या वक्तव्याच्या केलेल्या समर्थनाची खिल्ली उडवित, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. खासदार सुळे यांना स्वतःचे कोणतेच मत शिल्लक राहिले नाही.
लोकसभेत मांडलेल्या विधेयकाला त्या कधी पाठींबा देतात, तर कधी चर्चेवेळी गैरहजर राहतात. दुसरीकडे त्यांचे पिताश्री पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करतात, याकडे लक्ष वेधून, मंत्री विखे म्हणाले की, त्यांनी खरचं एकदा निर्णय घेतला पाहिले की, आघाडीसोबत रहायचे की, मोदी यांच्याबरोबर काम करायचे आहे. खरेतर त्यांच्या पक्षातील लोकांचासुध्दा त्यांच्या बोलण्यावर आता विश्वास राहिला नाही, असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.
महायुती म्हणूनच आम्ही लढणार!
उध्दव व राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या मुद्यावर भाष्य करताना, मंत्री विखे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात फक्त महायुतीच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विधानसभेसारखेच चित्र पहायला मिळणार आहे. निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.