‘पारनेर’ कारखाना विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करा Pudhari File Photo
अहिल्यानगर

Factory sale case : ‘पारनेर’ कारखाना विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करा

पारनेर न्यायालयाचा आदेश

पुढारी वृत्तसेवा

जवळा: देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर अँड पॉवर प्रा. लि. पुणे या खासगी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता. त्यानंतर कारखाना विक्रीची बेकायदा प्रक्रिया पूर्ण केली.

या कारखान्याच्या विक्रीसाठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या दिनांकास कारखान्याची विक्री केली त्याच दिनांकास क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्जपुरवठा केला.

कारखाना विक्रीच्या खरेदीखताला बोजा नसलेला बनावट सातबारा जोडण्यात आला. कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेला कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्याकरिता क्रांती शुगर या कागदोपत्री कंपनीचा वापर करण्यात आला. पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता केवळ 32 कोटी रुपयांना विकत घेऊन त्याच मालमत्तेवर सुमारे 300 कोटी रुपयांचे कर्ज काढले. पारनेर साखर कारखाना विक्रीतून कर्ज वजा जाता उरलेली सुमारे साडेबारा कोटी रुपये बँकेने कारखान्याला परत केली नाही. सध्या कारखाना उभा असलेली दहा हेक्टर औद्योगिक बिगरशेती जमीन राज्य सहकारी बँकेकडे तारण नसताना विकली.

पारनेर कारखाना विक्रीच्या या सर्व गैरव्यवहारांबाबत कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार सभासदांतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाने या याचिकेवर निर्णय घेण्याचे अधिकार हे पारनेर न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याचे सांगून याचिका निकाली काढली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

पारनेर न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कारखाना विक्रीतील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विक्री प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. त्या आरोपांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने पारनेर पोलिसांना फिर्यादीच्या अर्जाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयासमोर कारखाना बचाव समितीतर्फे अ‍ॅड. रामदास घावटे, अ‍ॅड. उन्मेश चौधरी यांनी बाजू मांडली.

गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा

पारनेर सहकारी साखर कारखान्याची, शेतकरी, सभासदांची कोट्यवधी किमतीची सार्वजनिक मालमत्ता राज्य सहकारी बँकेने गैरमार्गाचा वापर करून विक्री केली आहे. या प्रकरणात राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व देवीभोयरेचा तत्कालीन तलाठी यांचा आरोपींत समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांनी पालन करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करणारे निवेदन पारनेर पोलिसांना दिल्याचे कारखाना सभासद साहेबराव मोरे व बबनराव कवाद यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT