Rahata Molestation Case Pudhari
अहिल्यानगर

Rahata Molestation Case: विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

पोलिस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

पुढारी वृत्तसेवा

एकरूखे: राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे. प्रशासनाने संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली.

घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलिस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.

याप्रसंगी प्रतिक्रिया देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, “पीडितेला न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.

कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.” दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT