राजेश गायकवाड
आश्वी: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पहिले पाऊल सोमवारी टाकण्यात आल्यामुळे, आता नेत्यांसह निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना अगदी दिवसाढवळ्या स्वप्न पडू लागली आहेत.
संगमनेर तालुक्यातील आश्वी जिल्हा परिषद गट सर्व साधारण पुरुषासाठी राखिव होणार, अशा आशयाची चर्चा परिसरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक कार्यकर्त्यांची नेत्यांभोवती रेलचेल सुरु झाल्याचे दिसत असले तरी, विखे - थोरात या नेते द्वियींच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गट पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांचा सहकार क्षेत्रातील मोठा बाल्लेकिला समजला जातो. निवडणुकांसाठी दोन्ही आजी - माजी मंत्र्यांनी आप -आपल्या कार्यकर्त्यांची फौज तैनात केली आहे. हा गट निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेचा ठरणार आहे. यामुळे सर्व साधारण पुरुषासाठी जागा राखिव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या थोरात यांच्याकडून (काँग्रेस ) विजय हिंगे, तर विखे पाटील ( भाजप)कडून कैलास तांबे व भारत गीते या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. उमेदवार कोणीही असो, मात्र विखे - थोरातांमुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.
आश्वी जिल्हा परिषद गट प्रवरा 40 गाव परिसरात असल्याने बर्याच वर्षांपासून विखे परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा बालेकिल्ला समजला जातो, तर विविध सहकारी संस्थांच्या माध्यमांसह जुन्या ऋणानुबंधांमुळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव या परिसरावर आहे.
विखे गटाचे कैलास तांबे यांच्यासह भारत गिते, भगवान इलग, अॅड. पोपट वाणी, तबाजी मुन्तोडे, तर थोरात गटाकडून विजय हिंगे हे एकमेव नाव संध्या चर्चेत आहे. मोहीत गायकवाड निवडणुकीच्या तयारीत आहेत. वेळ आल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत ते दिसत आहेत. ही जागा महायुती धर्म पाळून रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशा भूमिकेतून आशिष शेळके यांचेही नाव चर्चेत आहे.
आश्वी गटामध्ये आश्वी बु. ( थोरात ), निमगावजाळी (थोरात) , चिंचपूर (थोरात), सादतपूर (विखे) औरंगपूर (थोरात), प्रतापपूर (विखे), मांची हिल (थोरात), आश्वी खुर्द (विखे), शिबलापूर (थोरात), शेडगाव (थोरात ), हंगेवाडी ( थोरात ) , पिंप्री लौकी अजमपूर (विखे), झरेकाठी ( थोरात) खळी (दोन्ही एकत्र), दाढ खुर्द ( विखे) तर, चणेगाव (थोरात) ही गावे येतात. बहुतांश ठिकाणी थोरात गटाचेच सरपंच आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत या सर्व गावांमधून राधाकृष्ण विखे पाटील यांना अधिक मताधिक्क्य मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘ही नावे सध्या चर्चेत..!
आश्वी जिल्हा परिषदेचे गट सर्वसाधारण पुरुष, आश्वी बु. गण पुरुष तर, आश्वी खुर्द ओबीसीकरिता महिला किंवा पुरुष राखिव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आश्वी बु. गणातून थोरातांकडून नवनाथ आंधळे, राहुल जर्हाड, माजी संरपच महेश गायकवाड व विवेक तांबे, तर विखे गटाकडून मच्छिंद्र थेटे, अनिल म्हसे व शिवाजी इलग यांची नावे सध्या चर्चेत आहेत. आश्वी खुर्द गणातून थोरातांकडून शिबलापूर सरपंच प्रमोद बोंद्रे, डॉ. संजय सांगळे, थोरात कारखान्याचे संचालक दिलीप नागरे, सुरेश फड, तर विखे गटाकडून निवृत्ती सांगळे, भारत गीते, प्रा. कान्हू गीते, सुरेश नागरे व दाढचे सरपंच सतिष जोशी यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
इच्छुकांनी बांधले गढघ्याला बाशिंग!
आश्वी गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी अगदी गढघ्याला बाशिंग बांधले आहे. हौसे - नौसे- गवसे या -ना -त्या मार्गाने निवडणूक लढविण्याची इच्छा नेत्यांकडे प्रगट करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, मात्र वरिष्ठांचा नेमकं कुणाच्या डोक्यावर आशीर्वाद पडेल, हे सांगता येत नाही.