लोणी: दाढ बुद्रुक येथे जनावारांना झालेल्या लम्पी साथरोग आजाराची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या गावोगावच्या आढावा बैठका घेवून लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष गावात जावून अधिकारी आणि शेतकर्यांशी संवाद साधला.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे गेल्या काही दिवसांपासून लम्पी आजाराने थैमान घातले आहे. पशुसंवर्धन विभागाची जिल्ह्याची आणि पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे यांनी या भागात दौरा करत दूध उत्पादकांना लंम्पी आजाराबाबत मार्गदर्शन करून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यामुळे पशुपालकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Latest Ahilyanagar News)
दाढ बुद्रुक येथील दुधउत्पादक शेतकर्यांनी गावात लंम्पी आजाराने धुमाकूळ घातला असून अनेक जनावरे दगावल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सर्व उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.
पशुसंवर्धन विभागाचे डॉ.दशरथ दिघे व त्यांच्या टिमने दाढ बुद्रुक गावात पोहोचुन संबंधित लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांना उपचार सुरू केले तसेच इतर जनावरे या आजाराने बाधीत होवू नयेत, म्हणून लसीकरण व उपाय योजना सुरू केल्या आहेत.
रात्री उशिरापर्यत पशुसंवर्धन विभागाची टिम थेट गोठ्यात जावून उपायोजना करत होती. या भागा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.प्रविण देवरे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त नाशिक डॉ. बाबुराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन उपा आयुक्त डॉ. संतोष पालवे, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय डॉ. मधुकर राजळे यांनी भेट देत प्रशासनाला सुचना केल्या.
यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुनील तांबे, गोरक्षनाथ तांबे, प्रताप तांबे भाजपाचे मंडल अध्यक्ष योगेश तांबे, सरपंच योगेश सातपुते,उपसरपंच अॅड.नकुल तांबेसंतोष वाणी, संजय गाडेकर, प्रमोद बनसोडे, सचिन वाणी, जितेद्र माळवदे आदी उपस्थित होते.
गोठा स्वच्छ ठेवा; लसीकरण करून घ्या!
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यामध्ये लम्पी विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सतर्क राहण्याची गरज आहे. लम्पी त्वचेचा रोग हा गुरांमध्ये पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे, जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, भूक न लागणे आणि दूध उत्पादन घटणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी, जनावरांची नियमित तपासणी करणे, बाधित जनावरांना वेगळे ठेवणे आणि शक्य असल्यास लसीकरण करणे आवश्यक आहे. जनावरांच्या गोठ्याची आणि आजूबाजूच्या परिसराची नियमित स्वच्छता ठेवा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी केले.