राज्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि सात वेळा विविध विभागांच्या मंत्रिपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात रविवारी (दि. 15) दुसर्यांदा झालेला समावेश अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करणारा ठरला आहे. राज्याचे मंत्री म्हणून विखे पाटील यांनी आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत सातव्यांदा शपथ घेतली. विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार यात कोणतीही शंका नव्हतीच; कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळते, याबाबत उत्सुकता मात्र आहे. मागील टर्मप्रमाणेच पुन्हा महसूलमंत्रिपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
सहकार चळवळीची असलेली पार्श्वभूमी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणारे विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये पदे भूषवून या क्षेत्रात नवनिर्मिती केली. सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून संस्थांचा पाया अधिक भक्कम केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पूर्ण झालेली 75 वर्षे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची 50 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बँकेस पूर्ण झालेली 50 वर्षे या सर्वांत राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व उपयुक्त ठरले आहे.
1995 पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. राहाता तालुक्याच्या निर्मितीपासून ते अलीकडच्या काळात स्थापन झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, काकडीचे विमानतळ, न्यायालयाची स्वतंत्र इमारत अशा अनेक ठळक बाबी या त्यांच्या विकासाच्या वाटचालीतील मानबिंदू ठरले आहेत. विकासकामांच्या सक्रियतेमुळेच शिर्डी मतदारसंघातून सलग आठव्यांदा चांगल्या मताधिक्याने निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.
कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी आली की, त्या विभागाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आहे. सरकार आणि संघटना यांचा योग्य समन्वय साधून काम करण्याचा मोठा अनुभव विखे पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला यामुळे गती मिळाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी शिवसेना-भाजपचे सरकार असताना 1997 ते 99 या कार्यकाळात कृषी, जलसंधारण, दुग्धव्यवसाय या विभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या काळात अॅग्रो अॅडव्हाटेज हे कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख करून दिली होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1995 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. आता 30 वर्षे होत आले; आजही या मतदारसंघाचे ते आमदार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी आणि आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत ते पुन्हा एकदा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. बाळासाहेब विखे पाटील 40 वर्षं खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून बाळासाहेब विखे यांनी वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले.
जिल्ह्याच्या दृष्टीने तीन औद्योगिक वसाहतींना उपलब्ध करून दिलेली जागा, निळवंडे धरण कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेला पाठपुरावा, गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 200 कोटी रुपयांचा उपलब्घ केलेला निधी, सावळीविहीर येथे मंजूर झालेले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, काकडी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसाठी मंजूर झालेला 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती दिली आहे. जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे उद्योग ही मोठी उपलब्धी त्यांच्या कार्यकाळात ठरली आहे.
2019 नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी डॉ. सुजय विखे पाटील यांना मिळवून मोठा विजय मिळविला. त्यानंतर जिल्हा पूर्णपणे भाजपमय करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न राहिले. मागील अडीच वर्षात राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये महसूल मंत्रिपदाची मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सोपविली होती.
शालेय शिक्षण, विधी व न्याय, परिवहन, बंदरे विकास, गृहनिर्माणमंत्री म्हणून त्यांनी लोकहिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले. अनुदानित शाळांसमोरील कायम शब्द काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतल्यामुळेच अनुदानित शाळांचा मोठा प्रश्न सोडविण्यात यश आले. स्कूलबसचे धोरणही त्यांच्याच कार्यकाळात राज्यात लागू करण्यात आले होते.
अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून त्यांनी महायुती सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रशासनाच्या सहकार्याने योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यात विखे पाटील यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
भविष्यात अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे आणि श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हा त्यांचा संकल्प असून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला नवी दिशा देण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे.