राहुरी: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आजच्या शुक्रवारच्या दौऱ्यात विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांची पाहणी करणार आहेत.
मात्र, विकासकामांच्या या दौऱ्याला आता राहुरीच्या राजकीय समीकरणांचीही किनार लाभली असून, पालकमंत्री विखे पाटील यांच्या दौऱ्यात आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार अक्षय कर्डिले हेही एकत्र पहायला मिळणार असल्याने, येथूनच खऱ्या अर्थाने मतदारसंघातील विकासाचा ‘नवा अध्याय’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
रस्ते, शासकीय इमारती, आरोग्य सुविधा, पोलिस प्रशासन, पशुवैद्यकीय सेवा तसेच इतर पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न राहुरी तालुक्यात प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर असतानाच पालकमंत्र्यांचा थेट दौरा होत असल्याने कोणत्या प्रश्नाला प्राधान्य मिळते, कोणत्या कामासाठी निधीची तरतूद होते आणि कोणत्या कामाला प्रत्यक्ष गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विकासकामांमधून राजकीय संदेश?
पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून राहुरी परिसरातील विकासकामांना मिळत असलेले पाठबळ पाहता, आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घडामोडी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे. विकासकामे हीच राजकारणाची नवी दिशा ठरू शकतात का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
विकासकामांमधून राजकीय संदेश?
पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून राहुरी परिसरातील विकासकामांना मिळत असलेले पाठबळ पाहता, आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घडामोडी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे. विकासकामे हीच राजकारणाची नवी दिशा ठरू शकतात का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आ.तनपुरे- आ.कर्डिलेंमुळे जनतेला फायदा!
आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे दोघेही पालकमंत्र्यांच्या ‘गुडबूक’मध्ये आहेत. त्यामुळे राहुरी मतदार संघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी स्वतः मंत्री विखे पाटील हेही मोठ्या मनाने राहुरीसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात, हेही यापूर्वीही अनेकदा पहायला मिळाले असल्याने आजच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
‘विखे फॅक्टर’ची चर्चा
राहुरीच्या राजकारणात स्थानिक पातळीवरील गटतट, नेतृत्वाची स्पर्धा आणि विकासकामांचा पाठपुरावा यांना नेहमीच महत्त्व राहिले आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरीत तनपुरे-कर्डिले हा गट एकत्र केला आहे. त्यामुळे विकासकामांना बळ मिळेलच, शिवाय भाजपाची ताकदही वाढलेली दिसणार आहे. आगामी जिल्हा बँकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीतही हे पहायला मिळणार आहे.
दोन्ही आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
एकीकडे आमदार अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे आमदार प्राजक्त तनपुरे हेही मतदारसंघातील विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे कोणता आग्रह धरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन्ही आमदारांची पालकमंत्र्यांसोबतची उपस्थिती आणि विकासकामांबाबतची भूमिका आगामी राजकीय समीकरणांसाठी संकेत देणारी ठरते का, याची उत्सुकता आहे. शुक्रवारचा दौरा त्यामुळे केवळ लोकार्पण आणि पाहणीपुरता मर्यादित न राहता राहुरीच्या विकासाचा आणि राजकारणाचा ‘दिशादर्शक’ ठरणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.