लाडक्या बहिणी आमच्याच सोबत; विखे पाटील यांचा विश्वास  Pudhari News
अहिल्यानगर

Maharashtra Assembly Polls: लाडक्या बहिणी आमच्याच सोबत; विखे पाटील यांचा विश्वास

महायुती जनमनातील सरकार - मंत्री विखे पाटील

पुढारी वृत्तसेवा

आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महाविकास आघाडी कोर्टात गेली. योजना फसवी आहे असे म्हणता मग का या योजनेसाठी आपण अधिकचे पैसे महिलांना देता. आमच्या लाडक्या बहिणी या आमच्या सोबत आहेत, त्यांना आता कळून चुकले आहे की आम्हीच त्यांचे खरे भाऊ आहोत. तेव्हा जनतेच्या मनात महायुतीचे सरकार असल्याने भविष्यातही सामान्य माणसाच्या पाठबळावर महायुतीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील चंद्रापूर, हसनापूर आणि दुर्गापूर येथील मतदारांशी संवाद साधताना विखे पाटील बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, मविआची पंचसूत्री फसवी आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून झाले आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटीमध्ये सवलत, नमो शेतकरी सन्मान योजना, दूध अनुदान, वयोश्री योजना, आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजना, शेतकर्‍यांना वीज बिलात माफी अशा विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत आधार देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे.

शिर्डी मतदार संघात विकासाची प्रक्रीया निरंतर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाचशे एकरांमध्ये होणारी औद्योगिक वसाहत यामुळे भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी आपल्या भागात निर्माण होणार आहेत. या औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी आचार्य कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली असून, हा उपक्रम फक्त शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 20 तारखेला जनताच तुलना करेल.

विकासाच्या गप्पा करणार्‍यांनी काय विकास केला हे एकदा जनतेला जाहीरपणे सांगण्याची गरज आहे. आपल्या संगमनेरचा विकास आणि शिर्डीचा विकास याची तुलना जनता ही 20 तारखेला करणार आहे. केवळ दहशत या मुद्द्यावर निवडणूक लढण्याऐवजी खरी दहशत कोठे आहे हे प्रत्यक्ष जनतेला माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT