उड्डाणपूल  file photo
अहिल्यानगर

पुणे-शिरुर 60 किलोमीटरचा उड्डाणपूल : खासदार नीलेश लंके

कामाला एप्रिलमध्ये होणार सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पारनेर : पारनेर, नगरपासूनजवळ असलेल्या पुणे शहराकडे जाताना शिक्रापूरपासून पुढे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील प्रवाशांना नेहमीच मनःस्ताप सहन करावा लागतो. मात्र प्रवाशांची ही डोकेदुखी येत्या काही वर्षात दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पतेतून खराडी बायपास ते शिरूर असा 60 किलोमीटर अंतराच्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी नगर-अहिल्यानगर-पुणे या महामार्गाचे सहा पदरीकरण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे अशी मागणी खा. लंके यांच्यासह शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे व छत्रपती संभाजीनगरचे खा. संदिपान भुमरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यापूवीच केलेली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासंदर्भात खा. लंके हे संसदेच्या अधिवेशनादरम्यान गडकरी यांच्या भेटीला गेले असता गडकरी यांनी खराडी बायपास ते शिरूर या तीन मजली उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होत असल्याचे तसेच शिरूर ते संभाजीनगर दरम्यानच्या रस्त्याबाबत राज्य शासनाशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अशी असेल वाहतूक व्यवस्था

तीन मजल्यांपैकी सर्वांत वरच्या मजल्यावरून महामेट्रो धावणार असून दुसरा मजला चारचाकी वाहनांसाठी असेल. तळमजल्यावरून अवजड वाहने जातील व येतील. शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, लोणीकंद व खराडी येथे या तीन मजली उडडाणपुलास बाह्यमार्ग जोडण्यात येणार आहेत, असे खा. लंके यांनी सांगितले.

अतिक्रमणे हटविली

शिरूर ते पुणेदरम्यान वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तीन मजली उड्डाणपुलासंदर्भात मंत्री गडकरी यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. त्या अनुषंगाने या रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

राज्यातील पहिला तीन मजली रस्ता!

खराडी बायपास ते शिरूर हा राज्यातील पहिला तीन मजली उड्डाणपूल असलेला रस्ता ठरणार आहे. हा अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT