राहुरी: राजकारणासाठी शहरातील नागरीकांना वेठीस धरू नका. नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरवा, त्यांच्या मुलभूत समस्या न सोडविल्यास गाठ माझ्याशी आहे. आगामी काळात तक्रारींचा निपटारा न झाल्यास राहुरी नगरपरिषदेवर भव्य जनआंदोलन उभारू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्याधिकार्यांना दिला.
राहुरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली आहे. कचर्याचे ढिग तसेच ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्याने आरोग्य समस्या वाढत आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राहुरी नगरपरिषदेत अचानक धाव घेतली. (Latest Ahilyanagar News)
मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडत तनपुरे यांनी नागरी समस्या मांडल्या. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, गजानन सातभाई, दशरथ पोपळघट, प्रदीप भुजाडी, नीलेश जगधने, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, अशोक आहेर, अरुण साळवे, विजय करपे, राजेंद्र शिंदे, राजू धनवटे, बाळासाहेब केळकर आदींनी आपल्या समस्या मांडत पालिका प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मांडल्या.
माजी मंत्री तनपुरे यांनी शहरातील कणगर रस्त्याची झालेली अवस्था, बुरूड गल्ली, तनपुरे वाडी रोड, नवि पेठ, पाणी टाकी परिसर, आझाद चौक, खाटीक गल्ली, स्टेशन रोड, माळी गल्ली, मल्हारवाडी रोड, कनगर रोड परिसरातील समस्या मांडत मुख्याधिकारी ठोंबरे व विभाग प्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. पावसाळा सुरू झाला आहे.
मान्सूनपूर्वीच पालिका प्रशासनाने रस्त्यांचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. अंतर्गत रस्त्यांसह विविध प्रभागात साचलेले पाण्याचे डबके, कचर्याचे ढीग पाहता नागरी सूविधा वाढल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पायी, सायकल तसेच वाहनातून जातानाही त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा फार्स करून केवळ सर्वसामान्यांना त्रास दिला.
पालिकेचे माजी कामगार शहरात बिनदिक्कतपणे अतिक्रमण करत असताना पालिका प्रशासन पाठबळ देत आहे. राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये वाढलेल्या समस्यांबाबत पालिका अधिकार्यांची चुप्पी घेतलेली आहे. शहरामध्ये समस्या वाढविण्यासाठी अधिकार्यांवर कोणी दबाव टाकत आहे का? शहरात काम होऊ नये म्हणून अधिकारी कामकाज करीत असल्याचे दिसत आहे.
अतिक्रमणबाबत पालिका प्रशासनाची दुतोंडी भूमिका
राहुरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत पत्रकार सुनिल भुजाडी यांनी पालिका प्रशासनाच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने अतिक्रमण काढल्याचा कांगावा केला. परंतु शनि मंदिर परिसर, कुलकर्णी हॉस्पिटल रोड (जुनी पेठ) शिवाजी चौक ते शुक्लेश्वर मंदिर रोड 40 फूट आहे. परंतु पालिका प्रशासनाने संबंधित परिसरातील व्यापार्यांना मोकळीक देत अतिक्रमण हटाव मोहिम गुंडाळली. केवळ गोरगरीबांचे अतिक्रमण काढण्यासाठीच आदेश होते का? असा प्रश्न भुजाडी यांनी उपस्थित केला.?
मुख्याधिकार्यांच्या दुर्लक्षाने शहराचे वाटोळे
माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी सांगितले की, माझ्या प्रभागातील समस्या वाढल्या आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून पालिकेकडे तक्रार करत आहे. परंतु मुख्याधिकारी ठोंबरे व त्यांचे विभाग प्रमुख हे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राजकीय दबावापोटी राहुरी शहरातील नागरीकांची कुचंबना केली जात आहे. राजकीय दबावापोटी शहरवासियांना त्रास देऊ नका, असे आवाहन भुजाडी यांनी केले.