दारुबंदीसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात आले  file
अहिल्यानगर

बाटली आडवी ! पानोडीत दारूबंदीचा ठराव

निर्णयाचे महिलांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले

पुढारी वृत्तसेवा

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात महिलांच्या पुढाकारातून दारूची बाटली आडवी करण्यात आली आहे. अर्थातच दारू बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री होत होती. या गैरप्रकाराविरोधात येथील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी दारू बंद करण्याची मागणी करीत, मंगळवारी तत्काळ ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेमध्ये महिलासह ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केला. दरम्यान, या निर्णयाचे महिलांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

पानोडी ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे गाव आहे. गावाला साकूर, शिबलापूर, पिंप्री लौकी आदी महत्त्वाची गावे जोडल्याने सुसंस्कृत म्हणून या गावाकडे पाहिले जाते; मात्र काही दिवसांपासून गावात लपूनछपून अवैध दारू व्रिकी सुरू होती. दारूमुळे घरगुती हिंसाचारांच्या घटना वाढल्या, कौटुंबिक कलह निर्माण झाले होते. मध्यतरी काही तरुणांनी कौंटुबिक कलहातून एका कुटुंबाला मारहाण केल्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली होती. असे कलह पुन्हा निर्माण होऊ नयेत, या उद्देशातून अखेर महिलांनीच पुढाकार घेऊन, दारूबंदीकरिता एक पाऊल पुढे टाकले, हे विशेष!

या वेळी सरपंच गणपत हजारे, उपसंरपच विक्रम थोरात, विनायक थोरात, रावसाहेब घुगे, गोपाळ थोरात, बबन कराड, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, रंगन्नाथ जाधव, महादू खेडकर, कैलास कराड, बाळू नागरे, रंगन्नाथ मुंढे, संजय जाधव, मधुकर कदम, विजय कदम, सुदाम सांगळे, रमेश मुंढे, अलिम सय्यद, गणेश कदम, ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणे आदी उपस्थित होते.

महिलांचा आक्रमक पवित्रा!

वादविवादाच्या घटनांमुळे पानोडी गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदीचा अर्ज देऊन, दारूबंद करण्याची एकमुखी हाक दिल्याने मंगळवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी गावात दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला. दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अधिकार्‍यांना पाठविला जाणार आहे.

‘वाटोळे झाले हो!’

‘पानोडी गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे आमच्या प्रपंचाचे अक्षरशः वाटोळे झाले हो, आम्हाला सुखाने जीवन जगू द्या,’ अशी आर्त हाक महिलांनी या ग्रामसभेत दिली. गावातील मंदिरासमोर उभे राहून, ‘दारूबंदी झालीच पाहिजे,’ ‘दारू बंद करा,’ अशा गगनभेदी घोषणा या वेळी संतप्त महिलांनी दिल्या. ‘दारूबंदी करायची का?’ असे ग्रामसेवक म्हणताच, एकमुखी ‘होय’ म्हणत महिला-पुरुषांनी हात वर केल्याने ठराव मंजूर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT