महाराष्ट्र पाणी परिषद Pudhari
अहिल्यानगर

‘नदीजोड’च्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू ; महाराष्ट्र पाणी परिषदेचे प्रस्ताव सादर

बैठकीत समाधानाचे बोल

पुढारी वृत्तसेवा

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील तुटीच्या खोर्‍यात पाणी आणण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारला सादर केलेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरु झाली आहे. याबद्दल महाराष्ट्र पाणी परिषदेने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, अनेक वर्षे रखडलेल्या तुटीच्या खोर्‍यातील प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावी, अशी अपेक्षा परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र पाणी परिषदेची महत्वपूर्ण बैठक जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत पार पडली. यावेळी पाणी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. वाय. आर. जाधव, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डी. एम मोरे, डी. वाय. नलगीकर, विवेक आपटे, आर. एम. लांडगे, अ‍ॅड. ए. एम. शेख, प्रा. एन. एम. पाटील, पाणी परिषदेचे निमंत्रक प्रा. बी. जी. भांगरे, उत्तमराव निर्मळ, प्रा. जी. एम पोंदे, पी. आर. खर्डे व जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र पाणी परिषदेने तयार केलेले प्रस्ताव सादर करण्यात आले.

केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले आहे. याबाबत परिषदेच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. पाणी परिषदेच्या अन्य प्रस्तावांवर कार्यवाही सुरु झाली असेल तर, हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत, या प्रकल्पांबाबत केंद्रासह राज्य सरकारचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याने ते पूर्ण होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

जलसंपदाचे अभियंता प्रकाश मिसाळ म्हणाले की, महाराष्ट्र पाणी परिषदेने अभ्यासपूर्ण रितीने सादर केलेले प्रस्ताव व त्यासाठी घेतलेले कष्ट वाया गेले नाहीत. आकडेवारीमध्ये थोडेसा बदल होईल, पण याच धर्तीवर विभागाने प्रकल्पांवर काम सुरु केले आहे. तुटीच्या खोर्‍यातील सुमारे 250 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यावर कार्यवाही सुरु झाली आहे असे सांगत, पाण्याच्या उगमापासून- प्रवाहापर्यंत अतिरिक्त पाणी तुटीच्या खोर्‍यात वळविणे हा विभागाचा प्राधान्यक्रम आहे. कृष्णा, गोदावरी, तापी व कोकण या सर्व विभागात अशाच पध्दतीने योजनांची कामे सुरु आहेत, असे ते म्हणाले. काही भागात वन विभागाच्या अडचणी समन्वयातून सोडविण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासित केले.प्रारंभी महाराष्ट्र पाणी परिषदेचे निमंत्रक प्रा. बी. जी. भांगरे यांनी पाणी परिषदेच्या प्रस्तावांचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डी. एम. मोरे आदी ज्येष्ठ सदस्यांनी मते मांडली. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांची जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल परिषदेने त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र पाणी परिषदेने तयार केलेले प्रस्ताव सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT