Prajakt Tanpure BJP Entry Pudhari
अहिल्यानगर

Prajakt Tanpure BJP Entry: प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप, बदलणार नवी समीकरणे

शरद पवार गटाला मोठा धक्का; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

राहुरी/मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख नेते जयंत पाटील यांचे भाचे तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईत शनिवारी (दि. 30) भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांचे स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तनपुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. सोहम तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. गेल्या अनेक वर्षांत राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीच्या राजकारणाचा चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या तनपुरे यांनी घेतलेली ही भूमिका आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारी ठरणार आहे.

आगामी निवडणुकांवर परिणाम?

राजकीय निरीक्षकांच्या मते, हा पक्षप्रवेश केवळ आजच्या राजकारणापुरता मर्यादित नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात. राहुरीतील राजकीय केंद्रबिंदू बदलण्याची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

तनपुरेंच्या नेतृत्वावर विश्वास

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना त्यांना ‌‘अभ्यासू, संयमी आणि विकासाभिमुख नेता‌’ अशी उपमा दिली. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. सुजय विखे पडद्यामागचे सूत्रधार

राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे दिसले. अगदी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा विजय साकारेपर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल 11 पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत कर्डिले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डिले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतीकार म्हणून डॉ. विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधी तब्बल सहा महिन्यांपासून डॉ सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते.

याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली आणि त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा आज रंगली.

विकासासाठी निर्णय: तनपुरे

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. राहुरी विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विभागलेला असल्याने अनेक विकासकामे आजही रखडलेली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर गतीने काम होण्याची गरज आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकारण हे केवळ पदांसाठी नसते; ते लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे माध्यम असते. मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेली राजकीय ताकद आणि प्रशासकीय पाठबळ मिळावे, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, डॉ. सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे विशेष आभार मानले. ‌‘उमेदवारीबाबतची भूमिका उद्या स्पष्ट करीन,‌’ असे ते म्हणाले.

आलिंगन सोहळा

मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मुत्सद्दीपणामुळेच तनपुरेंचा भाजपप्रवेश झाल्याचे शिक्कामोर्तब या कार्यक्रमात झाले. पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदर चव्हाण यांचा व त्यानंतर डॉ. सुजय विखेंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले. आजोबांनंतर आता नातूही एक झाले, याची आठवण आवर्जून काढली गेली. त्या वेळी एकच हशा पिकला. तनपुरे यांना मिठी मारण्याची कार्यकर्त्यांची इच्छाही सुजय विखेंनी पूर्ण केली. त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. हा सगळा पक्षप्रवेश पाहिल्यावर तनपुरेंना विखेंनीच भाजपमध्ये आणलेय, यावरही शिक्कामोर्तब झाले. या पक्षप्रवेशानंतर राहुरीची गणिते नक्कीच बदलतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT