नगर: केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. केडगाव येथे पीएम ई बससाठी चार्जिंग स्टेशन व बस डेपो करण्यात येत असून, डेपोचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पहिल्या टप्प्यात वीस बस मिळणार आहेत.
पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट 2023 रोजी 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 169 शहरांना तब्बल 10 हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 150, 10 ते 20 लाख व 5 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 100 व 5 लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार 35 सीटच्या 40 बसेस उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20 बस येणार आहेत.
पीएम ई बस चार्जिंग स्टेशन व बस डेपोचे केडगाव येथे अडीच एकर जागेत काम सुरू असून, जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सोनेवाडी सब स्टेशनपासून महापालिकेच्या सबस्टेशनपर्यंत विजेचा पुरवठा करणारी उच्च दाब वाहिनी टाकण्याचे काम महावितरणमार्फत अद्यापि सुरू झालेले नाही. त्यासाठी रक्कम महापालिकेने महावितरणला भरली आहे. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून त्यासाठी 1 कोटी 97 लाखांचा निधी थेट महावितरणकडे वर्ग झाला आहे.
तसेच, चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 9.06 कोटी रुपये मंजूर असून ते काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले आहे. अंतर्गत डीपी व वायरिंगचे काम बाकी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण काम पूर्ण होऊन अहिल्यानगर शहरात पीएम ई बस धावणार आहे. केंद्र शासनाने जाहिर ई निविदे द्वारे देशातील 169 शहरांना बसेस पुरविणेसाठी कंपनीची निवड केलेली आहे.
पीएम ई बस डेपोचे काम आता अंतिम टप्प्यात असून, सिव्हील वर्कचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. महावितरणची मुख्य वाहिनी आणि अंतर्गत किरकोळ काम प्रगतिपथावर आहे. येत्या काही दिवसांत ते काम पूर्ण होणार असून, लवकरच शहरात पीएम-ई बस धावणार आहे.यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका