जामखेड : शेतातील सामाईक पाईपलाईन फुटल्याच्या किरकोळ कारणातून पुतण्याने विळ्याने हल्ला करत चुलत्याची हत्या केली. जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा सख्या भावांना अटक केली आहे.
हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात अशी अटकेतील दोघा भावांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बळीराम राळेभात असे मृत चुलत्याचे नाव आहे. रंजना बळीराम राळेभात यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बळीराम आणि सखाराम या दोघा भावात शेतीचा वाद सुरू आहे. यासंदर्भातील वाद कोर्टात गेला असून तो प्रलंबित आहे. शुक्रवारी (दि.27) दुपारी हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात हे दोघे भाऊ शेतात आले. ते पाण्याची सामाईक असलेली मोटार सुरू करत असताना चुलते बळीराम यांनी ‘आधी शेतात फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करा, मगच मोटार सुरू करा, असे म्हणाले. त्याचा राग आल्याने पुतण्या हनुमंत याने हातात विळा घेत चुलत्याच्या दिशेने धावला. ‘मी जेलमध्ये जाईल, पण तुला सोडणार नाही’, असे म्हणत त्याने हातावर, पोटावर आणि पाठीवर विळ्याने सपासप वार केले. योगेश यानेही हनुमतंच्या मदतीला धावत चुलत्यास मारहाण केली.
दोघांनी बाजुला पडलेला दगड उचलून चुलते बळीराम यांच्या तोंडावर मारला. मारहाणीत गंभीर जखमी झालेले बळीराम यांना पत्नीने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून त्यांना अहिल्यानगरला हलविण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. जामखेड पोलिसांत दोघा भावाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.