शशिकांत पवार
नगर तालुका : एकेकाळी संपूर्ण नगर शहराची तहान भागविणार्या पिंपळगाव माळवी तलावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने तलावाला उतरती कळा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक खासगी नागरिकांनी तलावात अतिक्रमण केले आहे. मागील आठवड्यात खोदलेल्या अनधिकृत विहिरीचा ताबा मिळण्यासाठी जेऊर ग्रामपंचायततर्फे पालिकेला साकडे घालण्यात आले आहे.
नगरपासून अवघ्या 16 किलोमीटरवर असणार्या पिंपळगाव माळवी तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावाच्या भिंतीवर काटेरी कुंपण तयार झाले असून, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, तसेच बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे पहावयास मिळते. महापालिकेला मालकी हक्क देण्यात आला असला, तरी तलावात विहिरी, कूपनलिका घेऊन पाणीउपसा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही लोकांनी तर चक्क तलावातील जमीन विहीर, कूपनिलकांसाठी अनधिकृत खरेदी-विक्री केल्याचीही चर्चा परिसरात चालू आहे.
पिंपळगाव माळवी तलावाचे सुमारे सातशे एकर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. येथे एखादा प्रकल्प उभारून पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या वल्गना वारंवार करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत पालिकेकडून तलावाची साधी मोजणी, तसेच हद्द निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलावाबाबत संपूर्णतः गलथान कारभार सुरू आहे. तलावात पाणी असतानाही बेसुमार अवैध पाणीउपसा, अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात येते. याकडे पालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात अशाच प्रकारे एक अनधिकृत विहीर खोदण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर पालिकेने संबंधितावर गुन्हा दाखल केला. तलावातून जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंबा गड या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायततर्फे जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सद्यःस्थितीत तलाव कोरडाठाक पडला असून, तलावातून पाणीपुरवठा होणार्या गावांनाही पाण्याची झळ पोहोचू लागली आहे.
तालुक्यातील सर्वांत मोठे गाव म्हणून जेऊर गाव ओळखले जाते. गावची लोकसंख्या जास्त असल्याने जेऊर परिसरात वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पिंपळगाव तलावातील ग्रामपंचायतच्या विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खूप खालवली आहे. त्यामुळे गावाची तहान भागवण्यासाठी ग्रामपंचायतला मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेकडून खासगी संस्थांना तलावात कूपनलिका, विहीर घेण्यासाठी परवानगी कशी देण्यात येते? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तलावाचे खोलीकरण करताना शेतामध्ये टाकण्यासाठी माती (पोयटा) उचलतानाही अनेक खासगी व्यक्ती तलाव क्षेत्रावर मालकी हक्क सांगत आहेत. पोयटा उचलण्यासाठी खासगी लोक पैसे घेत असल्याचीही चर्चा सुरू असून, तलावाभोवती खासगी लोकांनी विळखा टाकला आहे.
तलावात घेण्यात आलेल्या अनधिकृत विहिरीचा ताबा देण्याबाबतचे निवेदन मंगळवारी (दि. 22) जेऊर ग्रामपंचायतीने महापालिकेला, तसेच जिल्हाधिकार्यांकडेही मागणी करण्यात आली आहे. यावर आता महापालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
आदिवासी समाजाच्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वेळा राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली. परंतु त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. तलावात आदिवासी समाजाच्या वर्षानुवर्ष असलेल्या अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात पालिका प्रशासन व आदिवासी समाजामध्ये संघर्ष चिघळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.