पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव येथील जागृत जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी चोरीला तब्बल दोन महिने उलटले, तरी पोलिसांकडून अद्याप चोरीचा तपास न लागल्याने बुधवारी (दि. 16) ग्रामस्थांनी वाजत- गाजत, तसेच घोषणाबाजी करीत पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांवरील दबाव वाढवला.
संस्कार भवन चौकातून सकाळी सुरू झालेला हा मोर्चा थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आला. येथे उपस्थित ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, तपासाची दिशा अजूनही स्पष्ट नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करीत, सदर गुन्ह्याचा तपास प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या मोर्चात शिवाजी काकडे, डॉ. रामदास बर्डे, विठ्ठल कुटे, अंकुश गिरी, पुंडलिक कुटे, भाऊसाहेब मरकड, हरीअण्णा काकडे, हरिभाऊ काकडे, सचिन वारे, पांडुरंग काकडे, नवनाथ काकडे, राजेंद्र चव्हाण, अमोल मरकड, रोहिदास चव्हाण, हनुमान पवार, गोकुळ काकडे, भगवान काकडे, भाऊराव काकडे, प्रवीण मरकड, नारायण मरकड, बाळासाहेब कुटे, अमोल काकडे, राजू मरकड, उद्धव काकडे, शिवाजी कुटे साहेब, रत्नाकर काकडे आदी सहभागी झाले होते. सर्वांनी पोलिस निरीक्षक पुजारी यांच्याशी चर्चा केली.
मंदिरातील दानपेटी चोरीची घटना 14 मे 2025 रोजी उघडकीस आली होती. तपासाच्या दरम्यान, चोरी गेलेली पेटी मंदिरालगतच्या शेतात आढळून आली होती. विशेष म्हणजे, चोरी घडली त्यावेळी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. हे कॅमेरे माजी उत्पादन शुल्क अधीक्षक शिवाजी कुटे यांनी मंदिरास देणगी म्हणून दिले होते, मात्र, ट्रस्टमधील पदाधिकार्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ते काढून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही चोरी पूर्णपणे पूर्वनियोजित होती आणि यामध्ये मंदिर व्यवस्थापनातीलच काहीजण सामील असण्याची शक्यता आहे. दानपेटीवरील लॉक कसे आणि कुठल्या पद्धतीने उघडले गेले, यावरून ही घटना कोणीतरी माहिती असलेल्या व्यक्तीनेच अंमलात आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात ग्रामस्थांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच तहसीलदार यांनाही निवेदन दिले आहे.
निवेदनात,मंदिर ट्रस्टच्या नावावर असलेल्या सुमारे 10 एकर जमिनीवर ट्रस्टच्या चेअरमन आणि विश्वस्तांच्या संगनमताने बेकायदा बांधकाम सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे .
पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तपासातील प्रगतीची माहितीही ग्रामस्थांना वेळोवेळी दिली जाईल.