पाथर्डी: पाथर्डी नगरपरिषदेचा पाच गुंठ्यांचा भूखंड एका खासगी व्यक्तिने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील वामनभाऊनगर येथील शिवम कॉलनीत असलेल्या या भूखंडावर बांधकाम सुरू करीत, त्या व्यक्तिने आपल्या मालकीचा फलकही लावल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. (Ahilyanagar News Update)
या प्रकारामुळे पाथर्डी नगरपरिषद रचना विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच समोर आला असून, नगरपरिषदेच्या मालकीचा भूखंड खासगी व्यक्तिच्या नावे कसा गेला, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. चौकशी दरम्यान हे सर्व प्रकरण उजेडात येणार आहे.
हा भूखंड या व्यक्तिने स्वतःच्या नावे खरेदी करून घेतल्याची माहिती या फलकावरून समोर आली. संबंधित ठिकाणी बांधकाम सुरू करण्यासाठी साधनसामग्री आणण्यात आली. मात्र, स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी त्या भूखंडाची पाहणी करून नोटीस दिली आहे. शिवाय, खासगी व्यक्तिने लावलेला फलक देखील पालिकेच्या कर्मचार्यांनी काढून टाकला.
नगरपरिषदेचा भूखंड खासगी व्यक्तीच्या नावावर कसा गेला? खरेदी-विक्री व्यवहारात नगरपरिषद किंवा निबंधक कार्यालयाची कोणती भूमिका होती? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक लवकरच जिल्हाधिकार्यांकडे, दुय्यम निबंधक कार्यालय व नगरपरिषद यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
या संदर्भात मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना विचारता संबंधित भूखंड हा पाथर्डी नगरपरिषदेच्या मालकीचा असल्याची माहिती दिली. यापूर्वीदेखील शहरात आणि तालुक्यात खाजगी व सरकारी खंडाचे बनावट खरेदी-विक्रीचे प्रकार घडले आहेत. सरकारी व पालिकेच्या मालकीचे भूखंड खासगी व्यक्तिंकडे कसे जातात? दस्तऐवज कुणी तयार करतो? यामागे कोणी अधिकारी-दलालांची साखळी कार्यरत आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.