Fake Job Letter Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Job Fraud: पाथर्डीत नोकरीच्या आमिषाने 30 लाखांची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्रांचा धक्कादायक प्रकार

नोटरी करारनाम्याद्वारे विश्वास निर्माण; तक्रार असूनही गुन्हा दाखल न झाल्याने संताप

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तालुक्यात नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, बनावट नियुक्तीपत्रासोबतच नोटरीद्वारे करारनामा करून विश्वासार्हतेचे आवरण निर्माण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशाच प्रकारे इतर अनेकांचीही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील रूपेशकुमार राम बागडे व प्रियांका महादेव आदापुरे (रा. शिक्षक कॉलनी, माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी) या दाम्पत्याने पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तक्रारीनुसार, अर्जदार दाम्पत्य शिक्षक पदासाठी प्रयत्न करत असताना त्यांची ओळख सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) याच्याशी होती. खेडकर याने स्वतः छत्रपती संभाजीनगर येथील अनुदानित संस्थेत नोकरी करत असल्याचे सांगत, तेथे डी.एड.च्या दोन जागा रिक्त असल्याचे आमिष दाखवले. यानंतर खेडकर याने संस्थाचालकाशी भेट घडवून आणली.

संस्थाचालकाला 30 लाख रुपयांच्या बदल्यात दोघांनाही शिक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. नोकरीच्या आशेने दाम्पत्याने नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत आरटीजीएस, ऑनलाईन व रोख स्वरूपात 30 लाख रुपये दिले. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने बनावट मान्यता आदेश व नियुक्तीपत्रही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, नोटरीद्वारे करारनामा करून उमेदवारांचा विश्वास संपादनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

13 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या या करारनाम्यात चेतनानगर (हर्सुल परिसर) येथे शिक्षक बदलाच्या नावाखाली नवीन नियुक्त्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीने इतर अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातल्याची शक्यता व्यक्त होत असून, या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करून इतर बळींचाही शोध घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

करारनामात काय!

करारनाम्यात जवरे लक्ष्मण रघुनाथ, रूपेशकुमार राम बागडे, सुग्रीव तुकाराम खेडकर व प्रियांका महादेव आदापुरे यांची सहशिक्षक म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली आहे. संबंधितांना त्यांच्या मूळ वर्गावर नियुक्त केल्याचे, त्यांच्या कार्यकाळात बदल झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच, दगाफटका झाल्यास उमेदवारांकडून घेतलेली 50 लाखांची रक्कम परत देण्याची जबाबदारी लिंबराज जाधव व सुभाष खेडकर यांच्यावर राहील, असा उल्लेख त्यात आहे. हा करार साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वखुशीने करण्यात आल्याचेही नमूद आहे.

आरोपीची जुजबी चौकशी

दरम्यान, संबंधित शाळेचा संस्थापक फरार असुन तो काही मध्यस्था मार्फत प्रकरण मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील सुभाष खेडकर याला पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावून घेत जुजबी चौकशी करून सोडून दिल्याने नवल व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT