जीवन संपविले file photo
अहिल्यानगर

Pathardi Crime: 'पिलू, मी रोज मरतो तुझ्यासाठी’, Whats App वर पाठवलेला मेसेज समोर; मृत्यूप्रकरणी सात महिन्यांनी गुन्हा

Man takes his life in Pathardi : महिलेसह तिघांविरुद्ध पत्नीची पाथर्डी पोलिसांत फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

Pathardi Crime News : नगर तालुक्यातील नागापूर येथील धनंजय सुरेश जाधव (वय 42) यांनी 28 सप्टेंबर 2024 रोजी धामणगाव (ता.पाथर्डी) शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात तब्बल सात महिन्यांनी त्यांची पत्नी उज्ज्वला धनंजय जाधव यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात एक महिला, तिचा भाऊ व मेव्हण्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार धनंजय जाधव यांची शेजारी राहणार्‍या अरुणा (नाव बदलले आहे) हिच्याशी ओळख झाली. तिचा पती कोरोनात मृत्यूमुखी पडल्यावर शासकीय योजना मिळविण्यासाठी तिने धनंजयकडून कागदपत्रांची माहिती घेतली. त्यामुळे दोघांचा फोनवर संपर्क सुरू झाला.

त्यानंतर अरुणा माहेरी धामणगावला राहायला गेली. परंतु धनंजयशी सतत फोन व ऑनलाइन चॅटिंग सुरू ठेवले. त्यामुळे घरात वाद वाढले. पत्नी उज्ज्वला यांनी अनेकदा विरोध दर्शवला. मात्र, अरुणा आणि तिच्या कुटुंबीयांकडून धनंजय यांच्यावर पैशासाठी दबाव टाकला जात होता, असेही तक्रारीत म्हटले आहे.

धनंजयने त्याच्या बहिणीस व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलेले व्हॉईस रेकॉर्डिंग आत्महत्येपूर्वीचे होते. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, अरुणा व तिच्या नातेवाईकांकडून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आहे. मी जर फाशी घेतली, तर तुला पोलिस चौकशीला सामोरे जावे लागेल, असे भावनिक शब्द त्या रेकॉर्डिंगमध्ये होते.

तसेच, अरुणासोबतच्या चॅटमध्ये ‘पिलू, मी रोज मरतो तुझ्यासाठी’, ‘तू मला फसवलंस’, ‘माझ्या मृत्यूनंतर पोलिस तुझ्या दारात येतील’, असे मजकूर असल्याचे उज्ज्वला यांनी नमूद केले आहे. हे चॅट धनंजयच्या व्हॉट्सअ‍ॅपवर 14 ऑगस्ट रोजी आढळून आले. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी धनंजय मोटारसायकलवर जेवणाचा डबा घेऊन कामासाठी बाहेर पडला. दुपारी त्याने गॅससाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले. संध्याकाळी उशीर होईल, असे सांगून त्याने फोन केला. रात्री आठच्या सुमारास त्याचा फोन पाथर्डी पोलिसांनी उचलला आणि त्याने आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. मृतदेह पाथर्डीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. पोस्टमार्टम नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 29 सप्टेंबरला झाले.

माझे पती सतत मानसिक तणावात होते. त्यांनी अनेकदा अरुणा व तिच्या भावाकडून पैशासाठी होणार्‍या त्रासाबद्दल सांगितले होते. परंतु पोलिसांत तक्रार देण्यास ते घाबरत होते. आज त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही अजूनही त्या धक्क्यातून सावरलेलो नाही. दोन्ही लहान मुलांना एकट्याने वाढवावे लागत आहे, असा भावनिक सूर उज्ज्वला जाधव यांनी लावला.

या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अरुणा (बदललेले नाव), गणेश काकडे (रा.धामणगाव ता. पाथर्डी) व अशोक एकशिंगे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT