Brave Girl Fire Rescue Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Brave Girl Fire Rescue: पाथर्डीत 10 वर्षीय विद्याचे शौर्य; भीषण आगीतून भावाचा जीव वाचवला

धायतडकवाडी येथे गोठ्याला आग; पाच शेळ्या दगावल्या, विद्याच्या सन्मानाची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अमोल कांकरिया

पाथर्डी: प्रसंगावधान, धाडस, शौर्य आणि कुटुंबाप्रती असलेली अपार जबाबदारी यांचा संगम काय असतो, याचे जिवंत उदाहरण धायतडकवाडी येथील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने घालून दिले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायतडकवाडी (ता. पाथर्डी) येथील इयत्ता चौथीत शिकणारी विद्या राजेंद्र धायतडक (वय 10)हिने भीषण आगीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान भावाचा जीव वाचवत अद्वितीय शौर्य दाखवले. स्वराज (वय 8) असे तिच्या भावाचे नाव असून, तो दुसरीत शिकत आहे.

रविवार (दि. 15) रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांतून विद्याच्या धैर्याचे कौतुक होत आहे. दुसरीकडे या आगीत होरपळून पाच शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

घटनेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते. घराजवळील जनावरांच्या कोठ्यात विद्या आणि तिचा लहान भाऊ झोपलेले होते. दुपारच्या सुमारास कोठ्याला आग लागली. क्षणार्धात धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला. विद्या या आगीतून कशीबशी बाहेर आली. तिने मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र जवळपास कोणीच नव्हते. शेतात गेलेले कुटुंबीय दूर असल्याने मदत मिळाली नाही. बघता बघता आग भीषण झाली. कशीबशी आगीत अडकलेल्या पाच शेळ्या काही क्षणांतच होरपळून गतप्राण झाल्या.

दरम्यान, धूर आणि ज्वाळांनी वेढलेल्या गोठ्यात तिचा भाऊ अजूनही झोपलेला असल्याचे तिच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता विद्याने आगीत धाव घेतली. ज्वाळांचा सामना करत तिने भावाला उचलले आणि आगीतून बाहेर आणले. विद्याने लहान वयात दाखवलेले हे धैर्य गावकऱ्यांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. क्षणभर उशीर झाला असता, तर अनर्थ झाला असता, असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, गावातील गणेश रावसाहेब धायतडक यांनी दुरून उठलेला धूर पाहून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आणि विद्याने मिळून उर्वरित शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढले. ग्रामस्थांनीही नंतर घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पाच शेळ्या आगीत जळून मृत्युमुखी पडल्या होत्या.

कुटुंबाला आर्थिक मदतीची ग्रामस्थांची मागणी

या कुटुंब शेतीसोबत पशुपालनावरही अवलंबून आहे. पाच शेळ्यांचा मृत्यू म्हणजे त्यांच्या उत्पन्नाच्या मोठ्या स्रेोतावरच गदा आली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत हे नुकसान अत्यंत गंभीर मानले जात आहे. शेतीतील अनिश्चित उत्पन्न, त्यात जनावरांचा आधार अशा परिस्थितीत झालेला हा आघात कुटुंबासाठी वेदनादायी आहे. गावकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. विद्याने दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि आपल्या भावावर असलेले प्रेम समाजासाठी प्रेरणादायी आहे. इतक्या लहान वयात संकटसमयी घेतलेला योग्य निर्णय तिच्या धाडसी स्वभावाचे द्योतक आहे. गावकऱ्यांतून व सर्वसामान्य नागरिकांतून अशी मागणी होत आहे की, शासन व जिल्हा प्रशासनाने विद्याचा विशेष सन्मान करावा. शालेय पातळीवर, जिल्हास्तरावर किंवा राज्यस्तरावर तिला शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, तसेच तिच्या शिक्षणासाठी विशेष मदत जाहीर करावी. विद्याच्या या कर्तृत्वामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. तिच्या शौर्याची चर्चा तालुकाभर सुरू असून हीच खरी धाडसी मुलगी अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT