पारनेर : नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात सुपा पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 20 हजारांचा तब्बल 112 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पथकासह ही कारवाई केली आहे. (Latest Ahilyanagar News)
पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल मरकड यांना शनिवारी (दि. 11) गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहाजापूर शिवारातील भाऊसाहेब सोनबा शिंदे हे त्यांच्या पिंपळगाव कौडा (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथील गट 155मधील शेतात अवैध गांजाची लागवड करत आहेत. ही माहिती खात्रीलायक वाटल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाईची तयारी केली.
गडकरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान कारल्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लपवून ठेवलेली आढळली. पोलिसांनी तातडीने झाडे जप्त केली असता त्याचे एकूण वजन 112 किलो असल्याचे निष्पन्न झाले. या झाडांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 11 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणात भाऊसाहेब सोनबा शिंदे (वय 59, रा. शहाजापूर, ता. पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकात पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, चालक सहायक फौजदार इथापे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मरकड, पोलिस कॉन्स्टेबल सातपुते, गायकवाड, कोल्हे, आढाव आणि शासकीय पंच यांनी सहभाग घेतला.