पारनेरजवळ दुर्घटना; तीन वर्षांच्या बालकाला बिबट्याने आईसमोरून ओढून नेले  Pudhari
अहिल्यानगर

Leopard Attack: पारनेरजवळ दुर्घटना; तीन वर्षांच्या बालकाला बिबट्याने आईसमोरून ओढून नेले

Parner Leopard Attack: बिबट्याने घेतला चिमुरड्याचा घास

पुढारी वृत्तसेवा

Leopard attack Parner child

पारनेर: पारनेर शहराजवळ असलेल्या सद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात बिबट्याने तीन वर्षांच्या चिमुरड्याचा घास घेण्याची दुर्घटना घडली. सोमवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने या चिमुरड्याला त्याच्या आईसमोरून उचलून नेले.

मंगळवारी सकाळी जवळच्या डोंगर परिसरातील जंगलात या चिमुरड्याचा केवळ डोक्याचा भाग सापडला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ आणि संतप्त भावना व्यक्त होत असून, बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नागरिकांमध्ये बिबट्याविषयी दहशतही निर्माण झाली आहे. (Latest Ahilyanagar News)

पारनेर शहराजवळ असलेल्या सिद्धेश्वरवाडी रस्त्यालगत बारामती ॲग्रो परिसरात परप्रांतीय बांधकाम मजूर राहतात. तेथे एका कुटुंबातील अमन पन्नूलाल खोटे (वय तीन) रात्री साडेआठच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर आला होता. त्या वेळी अमनची आईही त्याच्या सोबत होती. त्या वेळी जवळच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अमनवर झेप घेतली आणि त्याला उचलून अंधारात दिसेनासा झाला.

आईच्या डोळ्यासमोरच क्षणर्धात घडलेल्या या प्रकाराने अमनच्या आईने जोरजोरात आरडाओरडा केला. स्थानिक रहिवासी जमा झाले. तत्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही वेळातच येऊन परिसरात शोधमोहीम सुरू केली. स्थानिक रहिवासीही शोधकार्यात सहभागी झाले.

रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. पण अंधारामुळे मध्यरात्री शोधमोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी (दि. 9) सकाळी सात वाजता पुन्हा शोध सुरू करण्यात आला. त्यात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वरवाडी परिसरातील जंगलात, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळला. मृतदेह म्हणजे केवळ डोक्याचा भाग होता. तो पाहताच अमनच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. हा आक्रोश सर्वांचे काळीज चिरणारा होता.

शोधमोहिमेत वनपरीक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर, अंकराज जाधव यांनी भाग घेतला.

दरम्यान, या नगभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, गस्तही वाढविण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी 2 सप्टेंबरला तालुक्यातील कळस येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. एका आठवड्यात तालुक्यातील दोन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही चिंता वाढली आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक ठरत आहे. वन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे.

परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बिबट्यांचे प्रमाण सध्या वाढले नागरिकांनी मागणी केलेल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र अनेक वेळा बिबट्या त्यात कैद होत नाही. नागरिकांनी रात्री अपरात्री एकट्याने घराबाहेर पडू नये. लहान मुलांची काळजी घ्यावी. शक्यतो रात्री बाहेर पडण्याचे टाळावे, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT