आश्वी: पानोडी (ता. संगमनेर) गावात सध्या पाणी उशाशी आणि घशाला कोरड, अशी स्थिती पाहायला मिळत आहे. निळवंडे धरणाचा उजवा कालवा गावातून वाहत असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिक थेंब-थेंब पाण्यासाठी तरसत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गावातील नळ पाणीपुरवठा योजनेत प्रचंड विषमता दिसून येत आहे. काही प्रभागांमध्ये आणि ठराविक लोकांच्या घरी मुबलक पाणी मिळत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, काही लोक या पाण्याचा वापर थेट चेंबरमध्ये किंवा घरासमोरील गटारे वाहतील इतक्या मोठ्या प्रमाणावर करत आहेत. एकीकडे पाण्याचा हा असा अपव्यय सुरू असताना, दुसरीकडे मात्र, अनेक कुटुंबांना साधे पिण्याचे पाणीही वेळेवर मिळत नाहीये.
या गंभीर समस्येबाबत जेव्हा जागरूक ग्रामस्थ ग्रामपंचायतीत विचारणा करायला जातात, तेव्हा ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रशासकीय अनास्थेमुळे सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मार्च महिन्यात ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीसाठी कडक मोहीम राबवली होती. मात्र, धक्कादायक बाब अशी की, केवळ २० ते ३० प्रामाणिक नागरिकांनीच पाणीपट्टी भरली आहे. ज्यांनी थकबाकी ठेवली आहे, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई ग्रामपंचायतीने केलेली नाही. उलट, पाणीपट्टी न भरणाऱ्यांनाच मुबलक पाणी मिळत असून, कर भरणाऱ्यांना मात्र पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावठाणातील विहिरीतून २४ तास एका तलावात पाणी उपसा करून सोडले जाते. असे असतानाही गावठाणात केवळ एकाच वेळी पाणी का सोडले जाते? पाणी उपसा २४ तास सुरू असेल, तर ग्रामस्थांना मुबलक आणि योग्य वेळी पाणी का मिळत नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एकूणच पानोडी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून निळवंडेचे पाणी गावात असूनही ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याचे समान वाटप करावे आणि अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पानोडीकरांनी केली आहे.