नगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा बांधव मोर्चाने 27 ऑगस्ट रोजी नगरमार्गे मुंबईला जाणार आहेत. सततच्या वाहनांच्या गर्दीमुळे मोर्चातील नागरिकांना धक्का लागू नये, यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दि. 27 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित मार्गांवरील अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यात पांढरीपूल-मिरी-शेवगाव रस्त्याचाही समावेश आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी पत्रकाद्वारे तशी माहिती दिली. अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि. जालना) येथून मुंबईतील आझाद मैदानावर हा मोर्चा जाणार आहे. हा मोर्चा दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक, आळे फाटामार्गे शिवनेरी किल्ला, जुन्नर येथे मुक्कामी जाणार आहे. (Latetst Ahilyanagar News)
जरांगे पाटील यांच्या मोर्चावेळी त्यांच्या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या मार्गावर प्रचंड वाहनांची वर्दळ आहे. यामुळे मार्गावरील वाहनांचा मोर्चामधील नागरिकांना धक्का लागून, अपघात होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी मोर्चाचे आगमन व पुढे जार्ईपर्यंत अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरकडून नेवासा फाटा, पांढरीपुल, अहिल्यानगर, शेडी बायपासमार्गे जाणार्या अवजड व माल वाहतूकवाहनांकरीता पर्यायी मार्ग हा नेवासा फाटा, श्रीरामपूर, राहुरी फॅक्टरी, विळद बायपास मार्गे पुढे..असा असेल.
अहिल्यानगरकडून नगर एमआयडीसी, शेंडी बायपास पांढरीपूल मार्गावरील वाहनांकरिता पर्यायी मार्ग विळद बायपास-राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर, नेवासा फाटा असा असेल.
शेवगावकडून मिरी, माका मार्गे पांढरीपुलाकडे येणार्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कुकाणा, नेवासा फाटा मार्गे इच्छित स्थळी किंवा शेवगाव, तिसगाव मार्गे इच्छित स्थळी असा असेल.
पांढरीपूलकडून मिरी माका मार्गे शेवगावकडे जाणार्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जेऊर, कोल्हार घाट, चिचोंडी मार्गे इच्छित स्थळी असा असेल.