कैलास शिंदे
नेवासा : कांद्याच्या कमी अधिक दरवाढीने शेतकरी बुचकळ्यात पडला आहे. कांद्याला भाववाढ नाही अन् कांदा बियाण्यांना मात्र दरवाढ होत असल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याचे दर जैसे थे, मात्र कांद्याच्या बियाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विविध कंपनीच्या कांदा बियाण्याच्या दरात तब्बल एक हजाराने वाढ झाल्याने यंदा कांदा लागवड करावी की नाही? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे. (Ahilyanagar Latest News)
अहिल्यानगर जिल्हा कांद्याचे माहेरघर मानले जाते. त्यात मागील रब्बी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळेल या भरवश्यावर अनेक शेतकर्यांनी आपला कांदा अजूनही चाळीत बंदिस्त करून ठेवला आहे. त्यात दरात फारशी सुधारणा न होता कांद्याचे दर जैसे थे; मात्र यंदा रब्बी हंगामातील कांद्याच्या विविध कंपन्यांच्या कांदा बियाण्यात प्रति किलो हजारांची वाढ केली आहे.
मागील रब्बी हंगामात कांदा बियाण्याचे दर प्रतिकिलो बावीसशे ते अडीच हजार रुपये दिसून आले. त्यात काही शेतकर्यांनी साडेचार ते पाच हजार रुपये पायली विकले. मागील वर्षी विविध कंपन्यांच्या कांदा बियाण्याची पायली हिशेबाने विचार केला तर साडेसात हजार रुपये दराने विक्री करण्यात आली. मात्र यंदा तर किलोमागे दर एक हजार रुपयांनी वाढविल्याने शेतकर्यांना आता कांदा पीक अजून खर्चिक होणार आहे. त्यात यंदाच्या दराप्रमाणे पायलीला कांद्याचे बियाणे तब्बल दहा हजार पाचशे रुपयांना पडणार आहे.
मागील रब्बी हंगामात कांदा बियाणे अडीच हजार प्रतिकिलो मिळत होते. त्यात रासायनिक खताची 50 किलोची गोणी बाराशे रुपयांना मिळाली. कांदा लागवडीचा खर्च एकरी बारा हजार रुपयापर्यंत होता. पण आता सर्व काही महागल्याने कांदा लागवडीवर मोठा परिणाम दिसून येईल. एक तर पाच ते सात महिने कांदा काढून दिवस उलटल्यावरदेखील दरात वाढ झाली नाही. त्यात यंदा बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे, तणनाशक यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने आणि लागवड खर्चदेखील वाढणार असल्याने कांदा करावा का नाही, असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे.
मागील हंगामातील कांदा काढल्यानंतर शेतकर्यांच्या शेतात जागेवरच व्यापारी येऊन अकरा ते बारा रुपयांपर्यंत किलोने कांदा खरेदी करीत होते. त्यात काही शेतकर्यांनी पैसे करून घेतले; पण काही शेतकर्यांना वाटले की आज जागेवर बारा रुपयांपर्यंत कांदा खरेदी केला जात आहे, म्हणजे भविष्यात कांद्याला चांगला दर मिळेल. शेतकर्यांनी खर्च करीत कांदा चाळीत बंदिस्त केला, पण आज सात महिने उलटून देखील कांदा मार्केट थंडच असल्याचे दिसत आहे.
त्यात आता चाळीतील कांद्याला प्रारंभी अतिउन्हाच्या झळा बसल्या. त्यानंतर अवकाळी पावसाचा गार शिपका बसला. नंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर अजून गार वातावरण निर्माण झाले होते. त्यामध्ये आधी आता उन्ह. नंतर पावसाने गार वातावरण पसरल्याने कांदा आता खराब होऊन चाळीत सडू लागला आहे. मार्केटला विकायला आणावा तर दर नाही. चाळीत ठेवा तर सडू लागल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यावा हे समजेनासे झाले आणि त्यात यंदा हंगामातील वाढलेले बियाणे व कांदा गोणी 40 रुपये झाल्याने व रासायनिक खतांच्या वाढीव दराने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
विविध कंपन्यांचे कांदा बियाणे बाजारात दाखल झाले आहेत व कंपन्यांनी कांदा बियाण्याच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकरी कोणत्याही कंपन्यांच्या बियाणे खरेदीसाठी घाई करताना दिसत नाही. कारण महागडे बियाणे घेऊन शेतात टाकले व अतिजोराचा पाऊस झाला तर नुकसान होऊ शकते. लहरी वातावरणामुळे शेतकरी जोखीम पत्करू शकत नाही.