नगर : कामगार महिलेचा खून केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी धरत जन्मठेपे व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (दि.27) सुनावली. आरोपी मयुर संजय भागवत (वय 25, रा. शिवाजीनगर, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ताराबाई काशिनाथ चंदन (वय 72, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) असे मृत महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, आरोपी मयुर भागवत हा फिर्यादी खंडू काशिनाथ चंदन (रा. कुंभार गल्ली, कोळगाव) यांच्याकडे मूर्ती कारागीर म्हणून 2017 -18 पासून काम करीत होता. तो तिथे राहत होता. 30 मार्च 2023 रोजी सायंकाळी आरोपी कामावर आला असता मयत ताराबाई त्याला म्हणाल्या, उशिरा कामावर का आला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्या दिवशी रात्री आरोपी ताराबाईचा चाकूने खून करून पळून गेला. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
या खटल्याची सुनावणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे-गायके यांनी बाजू मांडली.