शशिकांत पवार
नगर तालुका : धकाधकीच्या जीवनात तरुणपणीच अनेक आजार वाढत आहेत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे. सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतोे. आरोेग्य दिनाचे विविध आजारांविषयी व उपचारांविषयी जनजागृती करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. सन 1950 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. त्यामागे आरोग्य विषयक समस्या, आजार व त्यांच्या उपचाराबाबत जनजागृती करणे. आरोग्यसेवा आणि सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
नगर तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असणार्या 43 उपकेंद्रांवर आहे . तालुक्यात 110 गावे असून वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेसमोरील अडचणी तात्काळ सोडविले सोडविणे गरजेचे आहे.
110 गावांसाठी चिचोंडी पाटील येथील एकच ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे. लोकसंख्येचा विचार करता जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा ऐवजी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण पाहता आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे ही तात्काळ भरण्याची गरज आहे.
आरोग्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, आरोग्य संस्था विविध कार्यक्रम घेऊन मोफत शिबीर, तपासणी, व्याख्याने आयोजित करीत असतात. नागरिकांमध्ये आजार व त्यावरील उपचारांविषयी जनजागृती होणे हे महत्त्वाचे आहे. तालुक्यात जेऊर, टाकळी खातगाव, टाकळी काझी, देहरे, वाळकी, चास, देवगाव, मेहेकरी, रुईछत्तीसी या गावांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. परंतु आरोग्य केंद्रातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम राहणे किती गरजेचे आहे याचे उदाहरण कोरोनाच्या काळात सर्वांनाच समजले.
लोकसंख्येच्या मानाने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. डॉक्टरांची संख्या वाढवणे, औषधातील पुरवठा सुधारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, आपत्कालीन सेवा बळकट करणे, सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सहकार्य वाढवणे अशा उपायोजना प्रभावीपणे राबविल्यास ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होऊ शकते.
नगर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक उपक्रमात तालुका अव्वल ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू असल्याचे पाहावयास मिळते. तीस वर्षांपुढील सर्वांना स्क्रीनिंग, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या उपचाराखाली आणले गेले आहे. कर्करोगांचे रुग्ण शोधून मोफत उपचार देण्यात येत आहेत. महात्मा फुले योजनेत तालुका अव्वल स्थानी आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात तालुका आरोग्य यंत्रणेचे कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.