नगर: महापालिकेच्या मालकीच्या व सध्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या खुल्या जागा, व्यापारी संकुलातील गाळे, ओटे, शाळा खोल्या, मंगल कार्यालयांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला आहे. 1016 मालमत्तांपैकी 682 गाळे, जागांचे करारनाम्यांची मुदत संपुष्टात आली आहे.
तसेच, बहुतांश भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे 25 काटींपेक्षा अधिक आहे. या थकबाकी वसुलीसाठी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मार्केट विभागाची दहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. वसुली, नुतनीकरण, कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी महापालिकेत आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मार्केट विभागाकडून तयार करण्यात आलेला सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. शहरात महानगरपालिकेची 33 व्यापारी संकुले आहेत. त्यातील 742 गाळे भाड्याने दिलेले आहेत.
तसेच, 74 खुल्या जागा, सात शाळांमधील 82 वर्ग खोल्या, दोन मंगल कार्यालये, तीन ठिकाणी पे अँड पार्कसाठी जागा व दोन व्यायाम शाळा भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातील 682 भाडेकरूंचे करार संपुष्टात आलेले आहेत.
161 गाळ्यांमध्ये पोटभडेकरु आहेत. यासह 130 गाळ्यांमध्ये परस्पर फेरबदल करण्यात आल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकीही आहे. एकूण थकबाकी 25 कोटींहून अधिक आहे. थकीत भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देत उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मार्केट विभागाची दहा पथके नियुक्त केली आहेत.
भाडे वसुली, करारनाम्यांचे नुतनीकरण, कारवाई या पथकांकडून केली जाणार आहे. थकबाकीदार गाळे धारकांनी सर्व थकबाकी एकरकमी भरल्यास राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनामत रक्कम व नवीन भाडे निश्चित करून करारनामे करून देण्यात येणार आहेत.
ज्या गाळेधारकांनी परस्पर बदल केले आहेत त्यांना 50 हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. मुदत संपलेल्या व थकबाकीदार गाळेधारकांना गाळे नुतनीकरण करून घेण्यासाठी ही संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन तत्काळ थकबाकी भरावी व करार नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.