नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या नऊ जनावरांची सुटका केली. तर, तीन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले. त्यानुसार आहेर यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, अतुल लोटके, रोहित येमुल, सागर ससाणे, मयुर गायकवाड यांचे पथक नेमून अवैध धंद्याचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी रवाना केले.
पोलिस पथक 6 मार्च रोजी पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना टाकळी ते वासुंदे जाणारे रोडलगत, टाकळी ढोकेश्वर येथे जाकीर बशीर बेपारी (रा. टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर) याने त्याच्या घराजवळ गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता चारा पाण्याचे डांबून ठेवले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने टाकळी ते वासुंदे रस्त्यावरील साहेब टोक येथील जाकीर बेपारी यांच्या घरी छापा घातला असता घरासमोर मोकळ्या जागेत गोवंशीय जातीचे जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले. त्याला नाव विचारले असता जाकीर बशीर बेपारी (वय 47, रा.साहेबटोक, टाकळी ढोकेश्श्वर, ता.पारनेर ) असे सांगितले. घरासमोरील जनावरे कत्तलीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळावरून
3 लाख 60 हजारांच्या गायी व कालवडीची सुटका केली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.