बोधेगाव : अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यात आखेगाव, भगूर आदी भागांत खासदार नीलेश लंके यांनी शेतातील चिखल तुडवत नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
शेवगाव तालुक्यात खासदार लंके यांनी गुरवारी (दि. 25) आखेगाव, वरुर, भगूर, आदी परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा केला आखेगाव येथील शेतकरी राजेंद्र करपे यांची संपूर्ण जमीन महापुरामध्ये वाहून गेली. खा. लंके यांनी काटे व चिखल झालेल्या शेतातून चक्क दोन किलोमीटर पायी चालत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. (Latest Ahilyanagar News)
पाहणी दरम्यान शेतकरी राजेंद्र करपे यांनी दागिने गहाण टाकून मी या जमिनीमध्ये ऊस लावला होता. आता मी काय करू मला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही, असे खासदार लंके सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले.
ज्या शेतकऱ्यांनी एक एक रुपया जमा करून शेती उभी केली. त्यांचे एका रात्रीमधून होत्याचे नव्हते झाले. राजू करपे या शेतकऱ्याची चार ते पाच एकर जमीन वाहून गेल्याचे मला दुःख आहे, अशी भावना खासदार लंके यांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी ग्रामसेवक सुरेंद्र जरांगे व तलाठी राठोड तसेच कृषी सहायकांना दिले.
यावेळी आखेगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार लंके यांना 2021 च्या पूरपरिस्थितीची आठवण करून दिली. त्यावेळेस देखील कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, त्याची पुनरावृत्ती यावेळेस आलेल्या आपत्तीत होऊ नये व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, त्याचबरोबर महापुरात फुटलेल्या बंधाऱ्याचे काम त्वरित करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली,
यावेळी शिवशंकर राजळे, तालुकाध्यक्ष हरीश भारदे, एजाज काझी, अप्पा मगर, बंडू रासने, तालुका उपाध्यक्ष शंकरराव काटे, विविध विभागाचे अधिकारी तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.