Fire accident in Newasa
कैलास शिंदे
नेवासा: मृत मयूर यांची मावस मावशी मालेगावात आहे. मावशीच्या मुलीला पाहुणे पाहण्यासाठी येणार असल्याने अरुण रासने व त्यांची पत्नी रविवारी सकाळीच नेवाशातून मालेगावकडे निघाले. सोयरीकीच्या कार्यक्रमाला उशिर झाल्याने मेहुणीने अरुण यांना आग्रह करून थांबवून घेतले. सोयरीकीच्या योगातून रविवारी रात्री अरुण व त्यांची पत्नी मालेगावात मुक्कामी थांबले अन् इकडे आगीत मुलगा, सून, नातवंडांचा मृत्यू झाल्याचा वियोग त्यांच्या नशिबी आला.
फर्निचर दुकानाची जबाबदारी मयूर हे पाहत होते. वडील अरुण हे त्यांना मदत करत असत. गोदामाच्या वरील मजल्यावर रासने कुटुंब राहते. आई-वडील हे मालेगाव येथे गेल्याने ते बचावले. आई-वडील वगळता अख्खं रासने कुटुंबाचा आगीने बळी घेतला. (Ahilyanagar Latest News)
सुमारे 5000 स्के.फूट आकाराचे हे गोदाम चारही बाजूने भिंती व पत्र्यांच्या छताने बनवलेले आहे. गोदामातील सोफा, दिवाण, खुर्ची, कूलर, फ्रिज, शोकेश, रॅक, टिव्ही, वॉशिंग मशीनला आग लागून भडका उडाला. रौद्र रूप धारण केलेली आग विझविण्यासाठी तातडीने अग्नीशामक दलाची वाहने पोहचली. त्यांनी पाण्याचा मारा करत आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली. अग्नीशामक दलाची वाहने वेळेत पोहचल्याने गोदाम परिसरातील इतर घरांना आगीची झळ पोहचली नाही.
रस्त्यावरून ये-जा करणार्यांनी सर्वप्रथम आग लागल्याचे पाहिले. त्याची माहिती समजताच समीर कबीर शेख, फारुख हमीद शेख, इरफान शरीफ शेख, वसीम आलम शेख, सोनू जहागीरदार, जमील शेख, माऊली तोडमल आग अटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली.
मात्र आगीचे रौद्र रूप पाहून त्यांचेही काही चालेना. आसपासच्या नागरिकांना त्यांनी सर्तक केल्याने मोठा अनर्थ टाळला.
नातलगांसह उपस्थितांना आश्रू अनावर!
रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याने अनेकांची मने हेलावून गेली. नातलगांनी अक्रोश करत हंबरडा फोडला. नेवासा अमरधाममध्ये मृत पाच जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांसह उपस्थितांना आश्रू अनावर झाले.