Water Crisis Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Water Crisis: नेवासा तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल; उन्हाच्या झळांनी पिकांवर संकट

भूजल पातळी घटतेय, गहू-कांद्यासह रब्बी पिकांवर परिणाम; पाटपाण्यामुळे काहीसा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधीही कोणताही ऋतू सुरू होत आहे. उन्हाळ्याला अजून महिनाभर अवधी असतानांच मार्च च्या प्रारंभीच उन्हाळा जाणवत आहे. उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यावर्षी नेवासा तालुक्यात लवकरच पाणीप्रश्नाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च पासूनच उन्हाळी झळा बसू लागल्या आहेत. नेवासा तालुक्यात जेमतेम पाणी पातळी असल्याने सध्या तरी टँकरची गरज नाही. दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याने गहू, कांदा पिकांना चांगलाच झटका बसत आहे. पाटपाण्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापूस, सोयाबीन मालाची वाट लागली आहे. शेतातील बोअरवेल उन्हाळ्याअगोदरच गुळण्या मारत आहेत. गेल्यावेळी नेवासा तालुक्यात दमदार असा पाणी पातळी वाढण्यासारखा पाऊस झाला असला, तरी मार्च अखेरीस पाणी कमी होण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी झालेल्या व थंडीचा मागमूसही दिसत नसल्याने गहू पिकांची स्थिती कशी होणार, या चिंतेत बळीराजा सध्या दिसत आहे. काही ठिकाणी गहू जोमात आहे. दमदार पावसाने पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये यंदा ऊसलागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विहीर व कूपनलिकांच्या पाण्याचा भरवसा नसल्याने कमी पाण्यात आणि कमी दिवसांत येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बी मधील कांदा, गहूसह अन्य पिकाला उन्हाचा फटका बसतो की काय, अशी भीती वाटत आहे. काही प्रमाणात खोडकिडा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. बऱ्याच भागात मार्च च्या मध्यापर्यंत गहू काढणीला येतील. तसेच अनेक शेतकऱ्यांनी शेततळे केलेले असल्याने ऊसाबरोबरच चारापिकांना या पाण्याचा उपयोग होणार आहे.

तालुक्यातील गंगाथडी भागातील बेलपिंपळगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव, भालगाव, वरखेड, गळनिंब, शिरसगाव, प्रवरासंगम या परिसरात जायकवाडीच्या फुगवट्यामुळे पाणी पातळी बरी आहे. गहू, ऊस पिके जोमात आहेत या पट्यात उशिरा उन्हाळा जाणवतो. धनगरवाडी, नारायणवाडी, झापवाडी, वांजळपोई, कारेगाव, मुकिंदपूर, म्हसले, गोंडेगाव, पिचडगांव, खडका, खलालप्रिंपी, तेलकुडगाव, वडूले, चिलेखनवाडी, सोनई परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यातील झळा जाणवू लागल्या आहेत. पाटपाणी आल्याने काही भागात पाणीपातळीत फरक पडला आहे. पंरतु ज्या भागात पाटपाणी अजून आले नसल्याने त्या भागातील पिकांची पाण्याअभावी तगमग चालू आहे. तर काही भागात गव्हाचे पाणी तुटले आहे. पाटपाण्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. उन्हाच्या झळ्यामुळे नागरिक हवालदिल होत आहेत.

पाटपाण्यामुळे रब्बीच्या पिकांना दिलासा!

मार्च महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाणी पातळी कमी होत आहे. काही भागात बोअरवेल गुळण्या मारत आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्यामुळे पाटपाणी लवकर सुटल्यामुळे रब्बीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पाटपाण्यामुळे उन्हाळ्यात गहू, हरभऱ्यासारखी पिके वाचतील.

गेल्या वेळी पावसाने चांगली हजेरी लावली. पंरतु शेतीमालाला भाव नाही. कांद्याने वांदा केला. पावसाळ्यात दमदार पाऊस झाला असला, तरी कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने जमिनीतील पाणी पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. यंदाचा उन्हाळा कडक असणार आहे.
विनायक जाधव, शेतकरी, गोंडेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT