नेवासा : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी नेवाशाच्या राजकारणाला काहीशी कलाटणी देणारा निर्णय जाहीर केला. ही नगरपंचायत निवडणूक ‘क्रांतिकारी शेतकरी पक्षा’च्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी आज (रविवारी) जाहीर केले. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचा कुठेही उल्लेख नसला, तरी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘जिल्ह्यात भूकंप होणार’ या भाकिताचा या निर्णयाशी काही संबंध आहे का, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. कारण डॉ. विखे यांच्या त्या वक्तव्यानंतरच अकोल्यात सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. आता नेवाशातील घडामोडी बदलू लागल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Ahilyanagar News)
नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गडाख बोलत होते. याप्रसंगी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, ॲॅड अण्णासाहेब अंबाडे, अण्णासाहेब पटारे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या सर्व जागा व नगराध्यक्षपदाची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार सर्वांनी बोलून दाखविला.
त्या वेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले, की आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. आपली ही लढाई ही कोणत्याही व्यक्ती वा पक्षाविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.
सर्वांना सोबत घेऊन काम काम करू. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व शिस्तबद्धपणे काम करून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत.
सोमवारपासून (दि 10) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, या बैठकीत कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत नव्या जोमाने आणि विकासाच्या हेतूने उतरल्याचे आमदार गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले. नेवासा शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.