इच्छुकांची नेतेमंडळींकडे फिल्डिंग! नेवासा निवडणुकीत पदांसाठी रंगतदार शर्यत Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Election: इच्छुकांची नेतेमंडळींकडे फिल्डिंग! नेवासा निवडणुकीत पदांसाठी रंगतदार शर्यत

नगराध्यक्षपद सर्वसाधारण, सभापतिपद ओबीसी प्रवर्गासाठी; संभाव्य उमेदवारांच्या हालचालींनी राजकीय फडात चैतन्य

पुढारी वृत्तसेवा

नेवासा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतिपदाचे नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय आखाड्यात आता मोठी रंगत आली आहे. आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाल्यामुळे त्यादृष्टीने आता इच्छुक मंडळी राजकीय फिल्डिंग लावून आपले बस्तान निवडणूक आखाड्यात बसविण्यासाठी संभाव्य इच्छुक मंडळीही सावध झाली आहे.(Latest Ahilyanagar News)

नेवासा पंचायत समितीचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे आणि नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी असल्यामुळे आता या दोन्हीही जागांसाठी इच्छकांची मोठी राजकीय आखाड्यात भाऊगर्दी होणार असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची कसरत पणाला लागणार असून, अनेकांना आता भावी ‌‘नगराध्यक्ष‌’ आणि ‌‘सभापती‌’ होण्याचे ‌‘डोहाळे‌’ या निवडणुकीसाठी लागल्यामुळे आता या इच्छुक उमेदवार संभाव्य नेत्यांना आवरण्यासाठी राजकीय नेतेमंडळींची चांगलीच प्रतिष्ठापणाला लावून बंडोबांना ‌‘थंडोबा‌’ करण्यासाठी राजकीय आखाड्यात राजकीय जादू चालवावी लागणार आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी शहरात अनेकजण सध्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक दिसत असले, तरी प्रमुख जनाधार असलेल्या मंडळींतच तगडी फाईट होणार आहे. मात्र, जनाधार असलेल्या मंडळींविरोधात काही हौशी ‌‘बंडोबा‌’ उतरवून मतांचे विभाजन करून आपलाच उमेदवार विजयी करण्यासाठी प्रमुख सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पडद्याआडून व्यूहरचना आखून मतांचे विभाजन करण्याची चाल खेळली जाणार असल्यामुळे शहरातील काही हौशी ‌‘बंडोबांना‌’ थंडोबा करण्यासाठी निवडणुकींच्या अस्राचा वापर करण्याची चाल राजकीय मैदानात खेळावी लागणार असल्याचे काही जनाधार नसलेल्या इच्छुकांच्या भूमिकेवरून राजकीय रणांगणात ही बाब स्पष्टपणे सद्यःस्थितीला चांगलीच दिसून येत आहे.

नेवासा पंचायत समितीचे सभापतिपद हे ओबीसी प्रवर्गाकडे आरक्षित झाल्यामुळे आता पंचायत समिती सभापतिपदाच्या शर्यतीतही अनेक इच्छुकांच्या नजरा या पदाकडे लागलेल्या आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांनी आपली रणनिती आखण्यात सुरुवात केल्यामुळे राजकीय नेतेमंडळींना या इच्छुकांनाही आता आवर घालून जनमतातील दावेदारांची मतविभागणी थांबविण्यासाठी राजकीय आखाड्यात चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

सत्ताधारी आणि विरोधी मंडळींकडे दोन्ही पदांच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांचा मोठा भरणा झालेला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घालून विरोधी उमेदवारांच्या मतविभागणीला कसा फटका बसेल? आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच तालमीतला कोण उमेदवार? उभा करून पडद्याआडून अशी खेळी करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींचा राजकीय फडात अभ्यास सुरू झालेला आहे, आणि त्यामुळे आता काही इच्छुक बंडोबांपेक्षा आपल्याच पक्षातील जनमतातील उमेदवारांचे विरोधी राजकीय पार्टीकडून मतांचे खच्चीकरण करण्याचा डाव मांडून राजकीय आखाड्यात होणाऱ्या निवडणुकीत गुलाल घेण्यासाठी व्यूहरचना आखण्याचे काम युद्ध पातळीवर गुप्तपणे सुरू झाले आहे. इच्छुक जनाधारातील मंडळींना राजकीय रणांगणात हैराण करण्याची नामी शक्कल आखण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झाल्यामुळे सुज्ञ मतदार या खेळीला उधळून लावणार की विरोधकांची जादू सक्सेस करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

आ. विठ्ठलराव लंघे व माजी आ. शंकरराव गडाख यांच्याकडे इच्छुकांनी उमेदवारीकरिता फिल्डिंग लावली आहे.

केवळ चहा पे चर्चा!

जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच नगरपंचायत या दोन्हींपैकी कोणती निवडणूक अगोदर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी व विविध पक्षांचे पदाधिकारी ठामपणे निवडणुकीबाबत निर्णय घेताना दिसत नाही. उघडपणे बोलत नाही. वावड्या उडवल्या जात आहेत. सध्या केवळ चहा पे चर्चा होताना दिसत आहेत. आचारसंहितेनंतर दोन्ही निवडणुकीची रंगत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT