नेवासा: नेवासा शहराला मिळणार्या तीर्थक्षेत्र विकास निधीमुळे शहरात नव्या विकासपर्वाची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नेवासा येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात मंत्री विखे बोलत होते. नेवासा नगरपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन आणि दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, नाशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक नितीन पिंपळे, सह जिल्हा निबंधक महेंद्र महाबरे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, दुय्यम निबंधक अंबादास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. (Latest Ahilyanagar News)
विखे पाटील म्हणाले, शहराच्या सौंदर्यीकरणासह तीर्थक्षेत्र विकासासाठी सांडपाणी व्यवस्थापनासारख्या मूलभूत कामांवर भर दिला जाणार आहे. आता सांडपाणी थेट नदीत सोडणे थांबवून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. या संदर्भात लागणारा निधी उपलब्ध करून देईन, पण नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे.
यावेळी त्यांनी शहरासाठी मंजूर झालेल्या विविध योजनांचा आढावा घेत विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. भरवस्तीत पोलिस ठाण्याची इमारत सुद्धा उभारली जात आहे. निधीची चिंता न करता कामे सुरू ठेवा, माझे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रारंभी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी अग्निशमन वाहनाचे पूजन आणि लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास नितीन दिनकर, उद्योजक प्रभाकर शिंदे, किसनराव गडाख, भाऊसाहेब वाघ, मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, डॉ. करणसिंह घुले, अंकुश काळे, अॅड. अशोक करडक, मनोज डहाळे, निखिल जोशी, निरंजन डहाळे, अमृता नळकांडे, डॉ. निर्मला सांगळे, नीता कडू, स्वाती गायकवाड, बंडू शिंदे, आदिनाथ पटारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाच्या माध्यमातून परतफेड: विखे
यावेळी आमदार लंघे यांनी नेवाशातील विकासकामांमध्ये पालकमंत्री विखे यांचे भरीव सहकार्य लाभत असल्याचे नमूद केले. शहरासाठी मंजूर झालेला साडेसात कोटींचा निधी हे त्याचेच फलित आहे. विधानसभा निवडणुकीत नेवासकरांनी मला भरभरून मताधिक्य दिले, त्यामुळे त्यांना विकासाची परतफेड देणे ही माझी जबाबदारी आहे.