राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा नाही, असे स्पष्ट करत येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अजितपर्व’ नवसंकल्प शिबिराचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते. मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या सडेतोड भाषणाचेही कौतुक पवार यांनी या वेळी केले. मात्र मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांच्याविषयी ते काहीही बोलले नाहीत.
पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, रूपाली चाकणकर, सुनेत्रा पवार, संध्या सोनवणे, कपिल पवार, सयाजी शिंदे, आनंद परांजपे आदी या वेळी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकांच्या अनुषंगाने नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. अजित पवार म्हणाले, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने जे उमेदवारीसाठी किंवा पक्षाच्या पदांसाठी उत्सुक आहेत त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
योग्य नियोजन केले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळेल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे. पक्षाचे संघटन वाढण्यासाठी तरुण आणि तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार असल्याचे अजित पवारांनी या वेळी सांगितले. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहोत, असे ते म्हणाले. त्यांनी शिबिरात दोन कक्षांची घोषणा केली. वैद्यकीय सहायता कक्ष आणि वचनपूर्ती कक्ष. ते पक्ष पातळीवर मार्चपूर्वी सुरू करणार असल्याचे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले, मुंडे यांची गाडी आज भाषणात सुसाट सुटली होती. मध्यंतरी जी वावटळ उठली होती त्याला पूर्णविराम देण्याचे काम आजच्या वक्तृवाने आणि भाषणाने केले आहे.
त्यांची अवस्था ना घर का, ना घाट का
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाराष्ट्रात आज काँग्रेससह शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाची अवस्था म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. ठाकरेंसह शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला आपली भूमिका काय हेच माहीत नाही किंवा काय भूमिका घ्यावी हेदेखील माहीत नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.