श्रीगोंदा: राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात गटतट बाजूला ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, असा निर्धार तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
श्रीगोंदा येथे दि. 29 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, भगवानराव पाचपुते यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. (Latest Ahilyanagar News)
जगताप म्हणाले, की निवडणुकांपेक्षा डिंबे-माणिकडोह बोगदा व एमआयडीसी व साकळाई योजना हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते काम अजित पवार हेच करू शकतात.
राजेंद्र नागवडे म्हणाले, की आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत.
घनश्याम शेलार म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीगोंद्यात मजबूत करण्यासाठी समन्वयकाची भूमिका करणार आहे. मला कोणतीही स्वतःसाठी निवडणूक करायची नाही.
राज्य पणन संघ फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे म्हणाले, की काय चुका झाल्या, यावर विचारमंथन करण्यापेक्षा एकदिलाने निवडणुकीस सामोरे जाणे हेच ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी प्रास्ताविक केले.