नगर : नगराध्यक्षपदांच्या जागेबाबत न्यायालयात अपिल दाखल झालेल्या जिल्ह्यातील कोपरगाव, पाथर्डी, देवळाली प्रवरा या तीन नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
या चारही नगरपालिकांसाठी आयोगाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार निवडणूक होणार आहे. याशिवाय उर्वरित 7 नगरपालिकांच्या 14 सदस्यपदांसाठीही न्यायालयात अपील दाखल असल्याने त्या ठिकाणाच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तेथेही सुधारीत कार्यक्रमानुसार निवडणूक होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरु असतानाच 29 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाचा आदेश धडकला आणि उमेदवारांत खळबळ उडाली.
नगरपालिका निवडणुकीसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झाले होते. परंतु अपिलाचा निकाल जिल्हा न्यायालयाकडून 23 नोव्हेंबरपर्यंत किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे, अशा पालिकांच्या सदस्यपदांच्या जागेच्या निवडणुका 2 डिसेंबर घेऊ नयेत.
कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी व नेवासा नगरपंचायत या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदांसाठी न्यायालयात अपील असल्यामुळे या पालिकांची संपूर्ण निवडणूक 20 डिसेंबरला घेण्यात याव्यात, असे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
याशिवाय श्रीरामपूर पालिकेच्या 1, संगमनेर 3, राहुरी 1, श्रीगोंदा 1, शेवगाव 3, जामखेड 2, शिर्डी 3 आशा 14 सदस्यपदाची अपील न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे या ठिकाणाची देखील निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे.
मात्र, निवडणुकीला अंतिम स्थगिती दिली असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला रात्रीपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत.
कोपरगाव :
छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. त्याविरोधात 29 अपील दाखल. न्यायालयाने 16 अपील रद्द केली तर 13 अपील मागे घेण्यात आली. न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. पण निकाल 23 नोव्हेंबरनंतर दिला.
नेवासा :
अपीलार्थी शंकर मुरलीधर लोखंडे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला आहे. अपीलार्थी निखील जोशी, सचिन नागपुरे, सुवर्णा नागपुरे, विवेकानंद ननवरे, निर्मला सांगळे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
देवळाली प्रवरा :
उमेदवारी अर्जातील जोडपत्र दोनमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुळ स्वाक्षरी नसल्याने रुपाली कुमावत, विनोद विश्वनाथ वाणी, नंदा प्रल्हाद बर्डे यांचे नामनिर्देशन अवैध ठरवले गेले. अमोल मुरलीधर कदम यांचा अर्ज वैध ठरला. विक्रांत पंडित यांच्या अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्याने नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले. अपक्ष गणेश भांड यांच्या नगराध्यक्ष पदाच्या अर्जाची निवडणूक आयोगाने नकार देताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रकाश संसारे व अमोल कदम यांच्या विरोधात विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली.
पाथर्डी :
श्रीमती जिजाबाई वाघमारे यांच्या अर्जात भाग 1 व 2 वर उमेदवाराची स्वाक्षरी नसल्याने नामनिर्देशन नामंजूर. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय नारायण आव्हाड हे अर्ज भरण्यास पात्र नसल्याची हरकत बंडू विठ्ठल बोरुडे यांनी घेतली. बोरुडे यांची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केली. त्यामुळे आव्हाड यांचा अर्ज वैध ठरला. या निकालाविरुद्ध दाखल अपिलावर जिल्हा न्यायालयाने 25 नोव्हेंबर निकाल देत बोरुडे यांचे अपील फेटाळले व आव्हाड यांची उमेदवारी कायम ठेवली.
ज्या जागेसाठी अपील दाखल होते, परंतू अपिलाचा निकाल न्यायालयाकडून 22 नोव्हेंबरनंतर देण्यात आला आहे, अशा नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांच्या निवडणुका सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार घेण्यात येवू नये. नगराध्यक्ष पदाचा समावेश असले तर त्या संपूर्ण नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले.
राहुरी : प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये पूजा दत्तात्रय साठे यांचा अर्ज निवडणूक प्रशासनाने बाद केला. साठे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने संबंधित प्रभाग 2 अ च्या जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या जागेवर 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होईल अशी माहिती निवडणूक सहायक अधिकारी तहसीलदार नामदेव पाटील, हराळ यांनी दिली.
जारी होणार 4 डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर
उमेदवारांची अंतिम 11 डिसेंबर
मतदान दिनांक 20 डिसेंबर
मतमोजणी व निकाल 21 डिसेंबर
राजपत्रात निकाल प्रसिध्द 23 डिसेंबर