नगरच्या नव्या विकास आराखड्याचे काम सुरू; सुधारणा किंवा त्रुटीबाबत संपर्क साधण्याचे आवाहन Pudhari
अहिल्यानगर

Nagar Development Plan: नगरच्या नव्या विकास आराखड्याचे काम सुरू; सुधारणा किंवा त्रुटीबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

मूळ व वाढीव हद्दीचा जमीन वापर नकाशा प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

Nagar new development plan

नगर: अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या नगररचना विभागाच्या पथकाने (डीपी युनिट) मूळ हद्द व वाढीव हद्दीचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला असून तो नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महापलिका व विकास योजना विशेष घटक कार्यालयात, कार्यालयीन वेळेत नकाशा पाहता येईल, तसेच तो महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे महापालिकेने जाहीर सूचनेद्वारे कळविले आहे. विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये काही सुधारणा किंवा त्रुटी असल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यास दखल घेण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 31(1) अन्वये अहिल्यानगर महापालिका क्षेत्राच्या मूळ हद्दीची विकास योजना अधिसूचना 4 जुलै 2005 अन्वये मंजूर आहे. वाढीव हद्दीची विकास योजना अधिसूचना 4 एप्रिल 2012 अन्वये मंजूर आहे. या विकास योजना सुधारित करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलमचे कलम 23(1) अन्वये सर्वसाधारण सभेचा ठराव करून 7 मार्च 2024 रोजी इरादा जाहीर केलेला आहे.

राज्य शासनाने नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या नगररचना विभागाचे पथक (डीपी युनिट) नियुक्त केले आहे. त्यांनी तयार केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा व अहवाल, नगररचना अधिकार्‍यांनी 14 ऑगस्ट रोजी महापालिकेस हस्तांतरित केला आहे. हा नकाशा नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध आहे. त्रुटी व दुरुस्त्यांसाठी नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तीनी कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभारी उपसंचालक तथा नगररचना अधिकारी पूनम पंडित व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. सदर नकाशा हा विकास योजना विशेष घटक, सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, तहसील कार्यालय समोर, अहिल्यानगर येथे व महापालिका, मुख्य प्रशासकीय कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT